जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान घाटात आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना अचानक आग लागली.चालकाच्या प्रसंग अवधनाने वेळीच चालक आणि त्याच्या सोबत असलेली प्रियसी हे वाहनातून जीव मुठीत घेवून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. घटनास्थळी नेरळ पोलीस हाजर झाले होते. तर दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखण्यात आल्याने घाटात पर्यटकांच्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. मात्र माथेरान नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाला चालकच मिळत नसल्याने घटनास्थळी कार जळून पूर्णतः खाक झाली होती.
शुक्रवार २४ जानेवारी रोजी नवी मुंबई बेलापूर येथील राहणारे सोनावळे हे आपल्या खाजगी डस्टर या चारचाकी वाहनातून माथेरान फिरण्यासाठी म्हणून प्रियसी सोबत आले होते. नेरळ येथून माथेरान घाट चढत असताना गारबट येथील रस्त्याच्या चढावावर अचानक कारच्या पुढील इंजिन बाजूने धूर निघायला लागला असताना क्षणार्धात आगीने गाडीत पेट घेतला. दरम्यान वाहन चालवणारे सोनवणे यांनी लागलीच हुशारी दाखवत रस्त्याच्या कडेला कार पार्क करून दोघे बाहेर पडले. यावेळी जीव मुठीत घेवून पळणारे सोनवणे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली तर स्थानिक वाहन चालक नागरिकांनी यावेळी धाव घेत त्यांना बाजूला करीत त्यांचे प्राण वाचविले आहे. माथेरान नगरपालिकेची असणारी अग्निशमन वाहनास स्थानिकांनी पाचारण केले असता वाहन चालवण्यासाठी हक्काचा नियोजित चालकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान माथेरान घाटात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या द बर्निंग कारचा थरार घडल्यामुळे तब्बल दीड तास वाहतूक सेवा बंद पडून वाहनांची कोंडी झाली होती. उपस्थित नेरळ पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवल्यामुळे घाटात दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहनातून उतरून बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी रस्त्यावर एकाच गर्दी केली होती. वाहनाला लागलेली आग शांत झाल्यावर पोलिसांनी येथील एकेरी वाहतूक सुरू करत घाटातील वाहतूक कोंडी मोकळी केली आहे. दरम्यान माथेरान अग्निशमन वाहनास तात्पुरता चालक मिळाल्यावर दोन तासानंतर हे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.
एकूणच माथेरान घाटात आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन वाहन उपलब्ध होवू न शकल्यामुळे मोठी हानी झालेली आहे. अग्निशमन वाहनावर २४ तास सेवा देणारे चालक नियमानुसार क्रमप्राप्त असताना मात्र माथेरान अग्निशमन वाहनावर चालक उपलब्ध नसल्याने आज या घडलेल्या घटनेत गाडी ही पूर्ण आगीत भस्म झाल्याचे बोलले जात आहे. तर नेरळ शहरात देखील अग्निशमन वाहन असावे म्हणून यासाठी याआधी वेळोवेळी मागणी पुढे आली होती परंतु नेरळ ग्रामपंचायत असल्याने येथे अग्निशमन वाहन कर्जत नगरपालिकेचे मागवण्यात येते त्यामुळे येथे आगीची एखादी दुर्घटना घडली तर घटनास्थळी वाहन पोहोचण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागतो त्यामुळे येणाऱ्या काळात नेरळ शहराला अग्निशमन वाहनाची आवश्यकता असल्याचा प्रश्न पुन्हा समोर आलय आहे. आज जर नेरळ शहराला अग्निशमन वाहन असते तर घटनास्थळी हे वाहन १० मिनिटात पोहचले असते, असे येथील स्थानिक वाहन चालकांकडून सांगण्यात येत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.