माथेरान (मुकुंद रांजणे) :
दस्तुरी नाक्यावरील येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी पासून ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. ही फसवणूकीची पध्दत लवकरच बंद करण्यात आली नाही तर १८ मार्च पासून बेमुदत माथेरान बंद करण्यात येणार असा इशारा समितीने सर्वच अधिकारी वर्गाला दिला होता त्यासाठी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन आज दि.१७ रोजी करण्यात आले होते.
या आयोजित केलेल्या बैठकीत स्थानिक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नसून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागणी केलेल्या शुल्लक मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन स्थानिक पातळीवर करू शकत नसल्याने या पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवार दि.१८ मार्च पासून बेमुदत बंद जाहीर केला असून त्यास येथील हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले असून जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागणी केलेल्या शुल्लक मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा ई रिक्षाची सेवा बंद करण्यात येणार आहे. असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले आहे.
-
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना ज्याप्रकारे फसवून, त्यांची दिशाभूल केली जाते, त्यांना बळजबरीने गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते.
-
मिनिट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करून अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळली जाते त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये.
-
जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.