माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपरिषदेने अनेक ठिकाणी रेडिमेड सुलभ शौचालये उभारली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या शौचालयांमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम यांनी सातत्याने नगरपरिषदेच्या कार्यालयात पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत, माथेरान नगरपरिषदेचे कार्यतत्पर प्रशासक आणि मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी तातडीने संबंधित कामगारांना सूचनाही दिल्या.
या सूचनेनंतर ज्या ठिकाणी सुलभ शौचालयांची दुरवस्था झाली होती आणि पाण्याची सोय नव्हती, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कामे मार्गी लावण्यात आली.
निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने संतोष कदम यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून, प्रशासक राहुल इंगळे आणि कामगारवर्गाचे आभार मानले आहेत.