निसर्गाने स्वयंपूर्ण जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ माथेरानमध्ये नागरिक वस्तीमध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसत आहे.नैसर्गिक जलस्रोत अटल्यामुळे पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरिक वस्तीकडे आल्याचे जाणकारांचे म्हणणे असल्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जंगलातच करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरानचे जंगल हे ७०० हेक्टरमध्ये वेढले गेले असून माथेरानच्या टापूवरील ३००हेक्टर आणि टापूखालील ४oo हेक्टरमध्ये पसरले आहे. त्यामुळे साहजिकच जंगली प्राणी असणारच.भेकर,रान डुक्कर,ससे,जवादा,पिसारा तसेच बिबट्याचा वावर देखील येथे आहे. माथेरानच्या ५४ किलोमीटर परिघात २७ नैसर्गिक जलस्रोत आहेत. ब्रिटिशकाळात यातील काही जलस्रोत टाक्या बांधून तयार करण्यात आले आहेत. या टाक्यांमध्ये साठवणूक केलेले पाण्याचे नियोजन जंगली प्राण्यांसाठी पुढच्या काळाचा ब्रिटिशांनी विचार करून तयार केले होते. प्राणीसुद्धा याठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतं. पण काळानुरूप हे नैसर्गिक जलस्रोत जमिनीची धूप झाल्यामुळे बुजून गेले. बेलवेडीयर विहीर,मॅलेट स्प्रिंग हे जलस्रोत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. तर हॅरीसन स्प्रिंग येथील टाकी इंदिरा गांधी नगर येथील तरुणांच्या मदतीने साफ केल्यामुळे पाण्याचा मुबलक साठा आहे.
२७ जलस्रोतांपैकी बोटावर मोजण्याइतके स्रोत जिवंत आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसात त्यातील पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागल्यामुळे पाण्याच्या शोधात हे प्राणी मानव नागरी वस्तीकडे वळू लागली आहेत.तीन दिवस अगोदर रात्रीच्या वेळेस ई रिक्षातून येताना काही लोकांना सखाराम तुकाराम पॉईंट जवळ एक रान डुक्कर महात्मा गांधी रस्त्यावर फिरताना दिसले, तर वूड लँड हॉटेल येथे काही महिन्यांपूर्वी एक रान डुक्कर मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले होते. तर मेरीटाइम बंगल्याच्या आवारात एक भेकराचे पिल्लू आपला जीव भटक्या कुत्र्यांपासून वाचवत असताना त्यांचे भक्षक बनले होते. इतक्या घटना होऊन देखील वन विभाग काही उपाय योजना करत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी येथील तरुण भावीन ठक्कर व त्याच्या मित्रांकडून जागोजागी छोटे कृत्रिम पाणवठे लावण्यात आले होते.त्यामुळे येथील माकड, वानर यांच्यासाठी हे फायदेशीर ठरले होते. असेच मोठे कृत्रिम पाणवठे जंगलात केले तर अनेक मुक्या प्राण्यांची तहान भागू शकते.
—————————————————
पेट्रोलिंग करत आम्ही दस्तुरीकडे जात असताना सखाराम तुकाराम पॉईंटच्या खालील वळणावर ई रिक्षा समोर एक मोठं रानडुक्कर आलं. ते रहदारी भागात आल्याने ते बिथरले होते आणि इकडे तिकडे धावत होते अखेर त्याला जंगलाचा रस्ता सापडला आणि ते क्षणार्धात जंगलात पळाले.
…दामोदर खतेले, गोपनीय पोलीस कर्मचारी, माथेरान.
—————————————————
उन्हाळा असल्यामुळे पाण्याच्या शोधात रान डुक्कर रहदारी भागात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पाणवठे तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. निधी लवकर उपलब्ध झाला तर आम्ही कृत्रिम पाणवठे तयार करणार आहोत.तसेच आम्ही आमची पेट्रोलिंग वाढवली आहे.
…राजकुमार आडे, वनपाल माथेरान विभाग
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.