माथेरान सारख्या या दुर्गम भागात कधी नव्हे ती विकास कामे मागील सहा ते सात वर्षांपासून प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.परंतु विकास तेथे विरोध हे गणितच असल्याने याही ठिकाणी नेहमीच स्वकीयांकडून प्रखरपणे विरोधाची भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या पारड्यात काही दक्षिणा पडत नाही तोपर्यंत एखाद्या प्रसार माध्यमांना हाताशी धरून सकारात्मक कामाला सुध्दा पडद्याआड राहून एखादे बुचगावणे तयार करून स्वतःची पोळी भाजून घेण्यात इथली व्हाइट कॉलरची राजकीय मंडळी निष्णात आहेत. आणि ज्यांच्या पक्षांच्या माध्यमातून विकास कामे पूर्ण होणार आहेत त्या पक्षांची मंडळी स्वतःच्या कार्यकर्त्यांना एखाद्या महत्वपुर्ण कामात सामावून घेण्याऐवजी विकास कामाच्या विरोधात कोण जाणार आहेत त्यांची तोंडे बंद करण्यासाठी चिरीमिरी देऊन अथवा अन्य माध्यमातून रसद पुरवून विरोध संपुष्टात आणला जात आहे.
राजकीय म्होरक्यांनी प्रत्येक वेळी मोठमोठ्या आलेल्या प्रकल्पात गडगंज आर्थिक प्राप्ती केलेली आहे.एवढेच नव्हे तर रोप वे सारखा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार होता त्याहीवेळेस टाटा समूहकडे या रोपे वे प्रकल्पात मोठी मागणी केल्यामुळेच हा प्रकल्प टाटा समूहाने सोडून दिल्याचे बोलले जात आहे.अन्यथा याठिकाणी पर्यायी व्यवस्था केव्हाच उपलब्ध झाली असती परंतु गचाळ, गलिच्छ राजनीती मुळे केवळ आर्थिक हव्यासापोटी हा प्रकल्प आजही लाल फितीत अडकून पडला आहे.त्यामुळेच ह्या सुंदर स्थळाला विकासापासून रोखण्यात राजकीय पक्षांचा सिंहाचा वाटा आहे.
पाच वर्षांपूर्वी याठिकाणी एमएमआरडीए च्या माध्यमातून जवळपास पन्नास कोटी रुपयांची रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याहीवेळेस प्रसार माध्यमांना हाताशी धरून कामात नकारात्मकता दर्शवून कुणाला दवाखान्यासाठी लाखो रुपयांची मदत मिळवून घेतली तर विविध कार्यक्रमासाठी लाखो रुपये उकळले गेले होते.त्यामुळेच ठेकेदाराने कामात टिकाऊपणा न ठेवता चालढकल करून निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहेत. नुकताच मलनिस्सारण प्रकल्पाची जवळपास पन्नास कोटी रुपयांची कामे सुरू केली आहेत. ही कामे सुरू करताना संबंधीत ठेकेदाराने कुणालाही विश्वासात न घेता परस्पर कशीही कामे सुरू केल्यामुळे राजकीय तसेच अन्य अल्प मतदार असणाऱ्या पक्षाच्या सदस्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
परंतु काहीतरी आमिष प्राप्त झाल्यामुळे त्यातील काहीनी आता हीच कामे उत्तम होत असल्याबाबत क्लीन चिट दिली असल्याची चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे जोपर्यंत काहिनाकाही चिरीमिरी प्राप्त होत नाही तोपर्यंत विकासाला गती देण्याऐवजी विरोधात जाऊन आपली आर्थिक भूक भागविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. तर नेहमीच विरोधात जाणारी मंडळी सुध्दा यावेळी मूग गिळून गप्प बसून आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आर्थिक पुरवठा झाल्यामुळेच आता ही बंद करण्यात आलेली कामे तुर्तासतरी सुरू झाली आहेत.अजूनही कुणाला काही प्राप्त झाले नसेल ती मंडळी प्रसार माध्यमांना हाताशी धरून आपला लढा आर्थिक प्राप्तीसाठी सुरूच ठेवणार आहेत यात शंकाच नाही.
——————————————————-
माथेरानमध्ये ठराविक राजकीय मंडळी गडगंज धनाढ्य आहेत. याठिकाणी जे काही मोठे प्रकल्प येऊ पाहतात ती कामे सर्वांनी मिळून एकत्रित केली तर सर्व पैसा गावात राहू शकतो. एरव्ही सर्वजण मिळून अनेक कामात व्यावसायिक मैत्रीचे दर्शन दाखवून एकत्रित उलाढाल करत आहेत. केवळ निवडणूक काळात जनतेसमोर परस्पर विरोधी भूमिका सत्तेसाठी दिखावा करून जनतेची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करून सरड्याची जात दाखवतात. याठिकाणी अनेक समस्या आजही ग्रामस्थ सोसत आहेत त्याकडे लक्ष केंद्रित न करता स्वार्थीवृत्ती शिवाय हीच राजकीय मंडळी काही ठोस भूमिका पार पाडत नाहीत. राजकारण बाजूला ठेवून एकदातरी यांनी या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी निःपक्षपातीपणे प्रयत्न केले तर या गावाचे नंदनवन होईल. पण साडेतीन हजार मतदार संख्या असलेल्या या गावात गल्लीबोळात नेते होऊ पहात आहेत. यांना गावाची चिंता नसून स्वतःच्या प्रतिष्ठेची चिंता लागली आहे. हे असेच राहिले तर हे गाव कायमस्वरूपी अन्य स्थळांच्या तुलनेत पिछाडीवर राहणार याला अपवाद स्थानिक असणार आहेत.तोपर्यंत राजकीय नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आलेली असेल आणि त्यांच्या क्षणभराच्या चुकांचा त्यांनाच पश्चाताप करावा लागणार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.