माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानमध्ये ई-रिक्षांमुळे पर्यटनाच्या क्षेत्रात क्रांती घडत आहे, परंतु रस्त्यांवरील खड्डे आणि दगडगोटे यामुळे प्रवास त्रासदायक ठरत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच काही मार्ग, विशेषतः वखारी नाक्यापासून ते पांडे रोडपर्यंतच्या भागात पाण्याच्या प्रचंड ओघामुळे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली होती.
स्थानिक रहिवासी आणि ई-रिक्षा चालकांनी या समस्येविरुद्ध वारंवार तक्रारी दाखल केल्यानंतर, माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. सध्या या रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून, पायी प्रवास करणारे नागरिक आणि ई-रिक्षा चालक यांना दिलासा मिळत आहे.
स्थानिकांकडून आता या सोबतच अन्य खराब रस्त्यांचीही जलदगतीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिकांना प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये.