माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानमधील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अवैध मटका आणि ऑनलाइन रेसचे जुगार व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे समोर आले आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे, परंतु त्यांच्या आयुष्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.
या जुगार व्यवसायामुळे अनेक तरुण लाखो रुपयांची उलाढाल करत असून, काहीजण कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. कर्ज फेडण्यासाठी काहींनी सावकारांकडून दहा टक्के व्याजाने पैसे घेतले असून, ते फेडता न आल्यामुळे काहींना गाव सोडावे लागले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला वर्गाने या प्रकारांविषयी आवाज उठवला असून, त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, संबंधित धंदे अद्यापही खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
रायगड पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.