माथेरान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आपल्या पक्षाला निवडणूक निधी देणार या आशेवर इथली राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यासाठीच महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील आपापल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणूक फंड निधी मिळविण्यासाठी आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत.
जवळपास ३९०० मतदार असलेली छोटीशी नगरपरिषद असून प्रत्येक वार्डामध्ये जेमतेम 200 ते 250 च्या आसपास मतदारांची संख्या आहे. त्यामुळे अनेकदा पैशाच्या जोरावर अकार्यक्षम उमेदवार सुद्धा अगदी सहज निवडून येतात. राज्यातील राजकारणाने सुद्धा खालची पातळी गाठलेली आहे. पक्षनिष्ठा,नीतिमूल्य, नैतिक जबाबदारी या सर्वांना तिलांजली देऊन जो तो स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करून स्वतःचा लाभ उठवत आहे. तीच परिस्थिती मागील काही वर्षांपासून माथेरानचे सुज्ञ मतदार सुद्धा अनुभवत आहेत. हौसे, नवसे, आणि गवशे यांना पक्षात प्रथमता प्राधान्य दिले जात आहे.
सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्यांदा विरोधकांची कामे जलदगतीने केली जात जातात आणि कार्यकर्त्याला आशेवर टांगत ठेवणे ही इथली वस्तूस्थिती आहे. ज्यांना गावामध्ये राजकीय दृष्ट्या काही एक काडीमात्र स्थान नाही त्याचप्रमाणे अशा लोकांमुळे पक्षाला राजकीय फटका मिळू शकतो अशांना गोंजारल्यास आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हम करे सो कायदा ही भूमिका अवलंबिल्यास आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा मोठा फटका त्या त्या पक्षांना मिळणार आहे.
मागील काळात लोकप्रतिनिधींनी आपसातील मतभेदांमुळे पक्षांतर करून काही प्रमाणात आर्थिक लाभ घेतला होता हे मतदार विसरलेले नाहीत. ज्या लोकप्रतिनिधींना आपली अमूल्य मते देऊन अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा राजकीय द्वेष ओढावला होता असे मतदार यावेळी गप्प बसणार नाहीत. लोकप्रतिनिधी जर अवाढव्य रक्कम घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करत असतात तर आपण सुद्धा यांना निवडून देण्यासाठी मतांचा मोबदला का घेऊ नये असाही प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावीच लागणार आहे.
ही झळ सोसण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज भासणार असल्याने काही करून त्यांना विधानसभेच्या उमेदवाराला आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. तेव्हाच कुठे विजयी उमेदवार निवडणुकीसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतो. निवडणुकीत लढाई देण्यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे केवळ पक्षाच्या निधीवर अवलंबून ज्यांनी ज्यांनी अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे त्यांची कोंडी होऊ नये यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणे क्रमप्राप्त आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.