माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानचे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल ( ऑलिंपिक मैदान) हे प्रसिद्ध मैदान असून आता याची दयनीय अवस्था झाल्याचे पाहावयास मिळते.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वात मोठे क्रीडा मैदान म्हणून माथेरानचे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल ( ऑलिंपिया मैदान) हे प्रसिद्ध मैदान असून या मैदानावर जानेवारी पासून मार्च महिन्यापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित करण्यात येतात. तर मे महिन्यात अश्व शर्यतीचे आयोजन करण्यात येते. क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी इथे प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते. जवळपास पंचवीस एकरांमध्ये ह्या मैदानाची व्याप्ती असून गावापासून दूरवर हे मैदान आहे.
याच मैदानाच्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीसाठी मागील काळात जवळजवळ पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु अयोग्य नियोजनामुळे ह्या मैदानाच्या विकास कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
स्टेडियम मधील शेडचे पत्रे गायब झालेले असून उन्हाळ्यात प्रेक्षकांना झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. तर दूरवरून क्रिकेट सामने पाहताना सुध्दा ज्या जांभ्या दगडांचा अनाठायी वापर करून एकप्रकारे ह्या मैदानाला बकालपणा आणलेला असल्याने हे मैदान पूर्णपणे विद्रुप झालेले दिसत आहे.
निदान प्रेक्षकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी स्टेडियम वर पत्रे लावण्यात यावेत जेणेकरून कुणालाही उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागणार नाही. प्रेक्षकांना क्रिकेट सामने पाहताना मनसोक्तपणे आनंद घेता येईल यासाठी संबंधित खात्याने याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी समस्त क्रीडाप्रेमीं मधून मागणी केली जात आहे.