महाड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगतापांची एक व्हिडीओ क्लीप फिरतेय. माणिकरावांनी जाता जाता सांगितले की गीतेंसारख्या चारित्र्यवान नेत्याला पराभूत करण्याचे पाप घडले. आता सैतानाला बाटलीबंद करण्याचे काम उर्वरित काळात करणार. आता तोच सैतान आपणासमोर निवडणुकीत उमेदवार असल्याने ते सैतानाला बाटलीबंद करण्याचे काम मतदार करतील आणि मतदानानंतर त्या बाटलीला बूच्च लावण्याचे काम मीच करणार, असा आवेशपूर्ण भाषण रायगड 32 लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी साखर येथे केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, महाड विधानसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप-कामत, संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा उपसंघटक बाळ राऊळ, अजय सलागरे, धनंजय देशमुख, राजिमस बँकेचे संचालक हनुमंत जगताप, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, शेकापक्षाचे वैभव चांदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाचे कृष्णा करंजे, बाळ राऊळ, स्वीटी गिरासे, अमित मोरे, पद्माकर मोरे, सुरेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी, जनसंवाद दौऱ्याची सुरूवात पोलादपूर तालुक्यातील साखर येथून होत असून साखर आणि जवळच्या उमरठमध्ये नरवीरांची जन्मभूमी म्हणून इथून सुरुवात करीत आहे. सुरुवातीला तातडीने साखरला सभा कारण साखर आणि उमरठ हे नरवीरांच्या निष्ठेचे उदाहरण असून निष्ठेचे पहिले नाव तानाजी मालुसरे आहे आपण निष्ठावंत आहोत म्हणून आपणच आपल्यासाठी टाळया वाजवल्या पाहिजेत. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, ही निष्ठेची लढाई आपण लढायची आहे. ज्यांनी निष्ठेला कलंक लावून गद्दारी केली; त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे. महाराष्ट्रात 59 टक्कयांची इंडिया आघाडी एकत्र होईल तेव्हा भाजपसोबतची एनडीए आघाडी देशातून राज्यातून हद्दपार हौईल. अनंत गीतेच्या चारित्र्यावर डाग लागला नाही आणि यापुढेही लागणार नाही. स्नेहलसाठी रेड कार्पेट अंथरून त्यावरून स्नेहल जगताप कामत यांना विधानसभेत पाठवणार, असा दृढनिर्धार यावेळी अनंत गीते यांनी व्यक्त केला.
प्रारंभी अजय सलागरे यांनी प्रास्ताविकामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबाबत जनसमुदायाला माहिती देऊन देशातील, राज्यातील तसेच महाड विधानसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली. यानंतर धनंजय देशमुख यांनी, जो विद्यार्थी हुशार असतो तो कमी वेळेत अचूक आणि चांगले काम करतो तर जो विद्यार्थी ढ असतो त्याच्यावरच शाळा संपली तरी जास्तीचा अभ्यास व गृहपाठ करण्याची वेळ ओढवते असे सध्याचे मुख्यमंत्री 18 तास काम करीत आहेत, अशी टीका करून ढ विद्यार्थ्यांमुळे राज्याचा आणि देशाचा निकाल कसा चांगला लागणार, असा सवाल करीत या निवडणुकीमध्ये अशांना घरी बसविण्याचे आवाहन केले.
जिल्हा उपसंघटक बाळ राऊळ यांनी, माणिक जगताप यांच्या निष्ठावंतांची आणि उध्दव ठाकरे यांच्या निष्ठावंतांची फौज एकत्र आली आहे. अनंत गीते यांना आपण तेली गल्ली ते नवी दिल्लीपर्यंत झेप घेताना पाहिले असून ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. यामुळे शिवसेनेने पुन्हा गीते यांना आठव्यावेळी उमेदवारी जाहिर केली असल्याचे आवर्जून सांगितले. शेकापक्षाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वैभव चांदे यांनी, शिवसेना म्हणून नव्हे तर रायगडचे संसदेतील नेतृत्व म्हणून अनंत गीते यांच्या विजयासाठी परिसर पिंजून मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
महाड विधानसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप-कामत यांनी, साखर गावातून प्रचाराची सुरुवात ही शेवट गोड होण्याची खात्री देणारी बाब असल्याचा विश्वास व्यक्त करून या मतदार संघाचा विकास अनंत गीते, प्रभाकर मोरे आणि माणिक जगताप यांच्या माध्यमातून झाला. सध्या फक्त जातीपाती धर्म आणि ठेकेदारीचे काम विकासाच्या नावाखाली सुरू असल्याची टीका केली. स्नेहल जगताप कामत पुढे म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग निर्मिती वेळी अनंत गीते खासदार असते तर पोलादपूर शहराचे चित्र वेगळे असते. महाबळेश्वर रस्ता सक्षम असता पर्यटनदृष्टया विकास झाला असता. आता महाड विधानसभा मतदार संघाच्या परिपूर्ण विकासासाठी अनंत गीते पुन्हा खासदार झाले तर स्नेहल जगताप आमदार होणे सहजशक्य असल्याचे सांगून अनंत गीते यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन स्नेहल जगताप यांनी केले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.