उरण (विठ्ठल ममताबादे ) :
शेवा कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा )चे प्रकल्पग्रस्त,शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचे पुनर्वसन उरण बोरी पाखाडी सरकारी खाजण स्मशान भूमी जवळ करण्यात आले. बोरी पाखाडी स्मशान भूमी जवळ परदेशी कुटुंब गेली ४० वर्ष वास्तव्यास आहे. मात्र पुनर्वसित असून देखील परदेशी कुटुंबियांना शासनाच्या पुनर्वसन कायदे अंतर्गत हव्या तशा १३ नागरी सेवा सवलती शासनाकडुन उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यातच परदेशी कुटुंबियांना दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
गेली ३ महिने पिण्याचे पाणी मिळत नसल्याने तसेच या संदर्भात शासनाच्या सर्वच विभागात अनेक महिने पत्रव्यवहार करून देखील न्याय न मिळाल्याने परदेशी कुटुंबियांनी अखेर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. कायदेशीर व शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून देखील न्याय मिळत नसल्याने परदेशी कुटुंबीयांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रमुख मागण्या
-
पाणी कनेक्शन कट करून परदेशी कुटुंबियांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पाणी कमिटीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून ती समिती बरखास्त करावी.
-
न्यायालयाचे आदेश परदेशी कुटुंबीय यांच्या बाजूने असताना संपूर्ण परदेशी कुटुंबियांना जेएनपीटीने टाकून दिलेल्या ग्रामपंचायतीच्या लाईन वरून पाणी मिळावे. आणि हे पाणी दररोज मिळावे.
-
पाणी न सोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी.
-
या घटनेस जे जे दोषी आहेत त्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर उचित कारवाई करावी.