महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या अधिकारी : प्रियदर्शनी मोरे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या अधिकारी : प्रियदर्शनी मोरे
जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या अधिकारी म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे पहिले जाते. प्रियदर्शनी मोरे या यापूर्वी पंचायत समिती उस्मानाबाद, पंचायत समिती पन्हाळा, जिल्हा परिषद कोल्हापूर विविध पदांवर कार्यरत होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी पाणी व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान, घरकुल योजनेत भरीव कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्हा परिषदेत ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यात महिला बचत गट चळवळ गतिमान करीत, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोण नावाच्या छोट्या गावातल्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील प्रियदर्शिनी मोरे यांचा जन्म झाला. वडील चंद्रकांत मोरे आणि आई संजीवनी मोरे दोघेही उच शिक्षित आणि समाजाप्रती बांधिलकी ठेऊन जगणारे! त्यामुळे लहानपणापासून तसे संस्कार त्यांच्यावर झाले. इ.६ वी मध्ये असताना एका स्पर्धा परीक्षा केंद्राची जाहिरात वृत्तपत्रामध्ये वाचून आपणही अधिकारी व्हावे असे त्यांनी ठरवले आणि त्यांच्या त्या स्वप्नाला त्यांच्या आई-वडिलांनी बळ दिले. स्पर्धा परीक्षा देऊन त्यांची प्रथम प्रयत्नात २००९ साली विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली. एक वर्ष या पदावर काम करत असतानाच त्यांची राज्यसेवा परीक्षेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी वर्ग-१ या पदावर निवड झाली.
त्या प्रथम गटविकास अधिकारी (वर्ग-१) पंचायत समिती उस्मानाबाद या पदावर रुजू झाल्या. या पदावर कार्यरत असताना त्यांनी पाणीटंचाईचा विषय संवेदनशीलपणे हाताळून प्रत्येक गावात पाण्याच्या पर्यायी स्त्रोतांचे प्रभावी व काटेकोर नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत केला. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सर्वात मोठा टंचाईग्रस्त जिल्हा असतानाही सर्वात कमी टँकर लावण्याची गरज पडली. त्यामुळे शासन खर्चात बचत झाली.
यानंतर गट विकास अधिकारी, पन्हाळा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ), जि. प. कोल्हापूर या पदावर कार्यरत असताना त्यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी गट विकास अधिकारी म्हणून २०१७ साली मा. मंत्री, पेयजल व स्वच्छता, भारत सरकार यांच्या हस्ते सन्मान, राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ आणि सुंदर शौचालय स्पर्धेत जिल्ह्याला दुसरे स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल २०१९ साली मा. मंत्री, पेयजल व स्वच्छता, भारत सरकार यांच्या हस्ते सन्मान, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता दर्पण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी २०२० साली केंद्र शासनाच्या वतीने आमिर प्रसिद्ध अभिनेता खान यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कार्यासाठी केंद्र सरकारतर्फे सन्मान, जल जीवन मिशनांतर्गत १००% उद्दिष्टे पूर्ण करून वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आणि त्यांचे ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याहस्ते सन्मान इ प्रमुख पुरस्कार व सन्मानांचा समावेश आहे.
कोल्हापूरमधील पदावधी पूर्ण झाल्यानंतर त्या पदोन्नतीने प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड या पदावर रुजू झाल्या. या पदाच्या प्रमुख जबाबदाऱ्यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांची बांधणी, त्यांना प्रशिक्षण आणि अर्थपुरवठा करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे व त्यांना प्रवाहात आणणे या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. यास अनुसरून मागील दोन वर्षात राज्य पुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत प्राप्त उद्दिष्टानुसार ५ हजार ३५० व केंद्र पुरस्कृत २७ हजार अशा एकूण ३२ हजार ३५० घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून प्रयत्न करण्यात आले आहे. मागील काही वर्षांतील हा सर्वाधिक घरकुल मंजुरीचा आकडा आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात ही घरकुले पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत सध्या जिल्ह्यात १९ हजार २१६ गट कार्यरत असून ८८३ ग्रामसंघ व ५९ प्रभागसंघ स्थापन करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांत फिरता निधी, समुदाय गुंतवणूक, जोखीम प्रवणता निधी इ स्वरुपात सुमारे ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून बँक कर्ज पुरवठा सुमारे ४०६ कोटी २५ लाख इतका उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून स्वयं सहायता गटातील महिला होम स्टे, मसाले, कडधान्ये, लाडू बनवणे, SANITARY PADS बनवणे, गणपती मूर्ती बनवणे, खानावळ , सेंद्रिय भाजीपाला इ व्यवसाय करून स्वताच्या पायावर उभ्या राहत आहे.
…अमुलकुमार जैन, अलिबाग  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading