महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोकण अध्यक्षपदी शैलेश पालकर

Shailesh Palkar
पोलादपूर :
ग्रामीण भागातील पत्रकारांचे मी प्रतिनिधीत्व करताना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत असतो. काही पत्रकार राजकीय नेत्यांचे पाय चाटून संसदेपर्यंत पोहोचतात, त्यापैकी अशोक वानखेडे नाही, हे ठणकावून सांगू शकतो. ग्रामीण पत्रकारांकडे खऱ्या अर्थाने न्यूज कन्टेंट असते; मात्र, तसे न्यूज कन्टेंट नसलेल्या आणि शानोशौकतमध्ये राहणाऱ्या शहरी पत्रकारांसारखे ते वागू पाहतात. या पत्रकारांचे प्रश्न सोडविले तरच तळागाळापर्यंत पोहोचलेली लोकशाही सक्षमपणे जागृत असल्याचे पाहण्यास मिळेल, असा ठाम आशावाद ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकभाऊ वानखेडे यांनी कोथरूड पुणे येथे व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपिठावर ज्येष्ठ राजकीय समीक्षक हेमंत देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संघटक संजय भोकरे, नूतन अध्यक्ष गोविंद वाकडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे व हरिश सोमानी, डिजिटल मिडीयाचे प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, नागपूर विभाग प्रमुख महेश पानसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोकण कार्याध्यक्ष रायगडचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांची कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड जाहिर करण्यात येऊन संस्थापक संजय भोकरे, हेमंत देसाई आणि अशोकभाऊ वानखेडे यांच्याकडून पालकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रायगडचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे आणि सर्व उपस्थित जिल्हाध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अशोकभाऊ वानखेडे यांनी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाच्या उभारणीनंतर देशभर केंद्रसरकारची वाहव्वा होत असताना सरदार पटेल यांच्या गावाची काय स्थिती आहे, हे एका ग्रामीण पत्रकाराने आपल्या निदर्शनास आणून दिले. म्हणजेच सरदार पटेल यांच्या गावाचे गावपण हिरावून हा भव्यदिव्य उपक्रम साकारण्यात आल्याचे केवळ ग्रामीण पत्रकारांच्याच निदर्शनास येऊ शकते, असे सांगून दुसऱ्या पत्रकाराच्या उन्नतीबाबत फक्त पत्रकारांनाच आकस वाटत असेल तर पत्रकारच पत्रकारांचे वैरी होऊ लागून लोकशाहीचा चौथा स्तंभ हे घटनादत्त स्थान धोक्यात येऊ शकते, असा इशाराही दिला.
याप्रसंगी राजकीय समीक्षक हेमंत देसाई यांनी, पत्रकारांनी जनतेचे प्रश्न मांडावेत आणि शक्यतो विरोधी पक्षाची भूमिका घेतल्यास लोकशाहीतील जनतेला लोककल्याणाची भूमिका मान्य होते. गोदी मिडीयातील देशातील 6 प्रमुख वृत्तवाहिन्यांची 2014 ची वार्षिक उलाढाल 6 हजार कोटी आजही तशीच आहे मात्र, प्रॉफिट वाढलेला दिसून येत नसल्याने केवळ सरकारची सर्वच धोरणं बरोबर आहेत असं म्हणण्याचा फटका या गोदी मिडीयाला बसलेला दिसत आहे. पत्रकार मग डिजिटल, प्रिंट अथवा वेब मिडियातील असो त्यांनी विरोधी भूमिका घेतल्याचा फायदा आणिबाणीनंतर जनता दलाचे विशेषत: जनतेचे प्रश्न मांडण्याने नियतकालिकांना झाल्याचे दिसून आले. पत्रकारांनी तटस्थ असावे. मात्र, ‘हेही खरे आणि तेही बरे’ अशी केळकरांसारखी दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही, असे मत यावेळी मांडले.
याप्रसंगी संस्थापक संजय भोकरे यांनी, पत्रकारांच्या संघासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्याकामी ज्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्याच प्रमाणे भविष्यात जिल्हा व शहरांत पत्रकार भवन उभारण्याकामी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
नूतन प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी, 14 वर्षांपूर्वी पहिल्या पुरस्कार वितरण सोहळयापासून आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघासोबत सक्रीय आहोत याचेच फळ म्हणून यापूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्षपद देऊन वसंतराव मुंडे यांनी राज्यावर काम करण्याची संधी दिली. आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू असा विश्वास सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेने व्यक्त करीत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading