
माथेरान (मुकुंद रांजणे) :
आयुष्याच्या वळणावळणाचा यशस्वी टप्पा हळुवारपणे पादाक्रांत करताना आजवर मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा कुठेही गाजावाजा न करता अत्यंत संयम, आणि नम्रतेने जनमानसात आपला ठसा कायम ठेऊन शून्यातून जरी विश्व निर्माण केले असले तरी सुद्धा आजही पाय जमिनीवर ठेवणारे क्वचितच असतात त्यामधील एक नाव म्हणजे माथेरानचे भूमिपुत्र तथा माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर होय.
कामावर लक्ष केंद्रित करून उराशी जे ध्येय बाळगले होते ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.
इंजिनियर ह्या व्यवसायात खेडकर यांनी आपले पाय घट्ट रोवून अनेक उच्च स्तरीय शासकीय बांधकामे पूर्ण केली आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि दर्जा ही वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळेच त्यांना सुक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायीकांच्या (MSME) विभागातील व्यावसायीकांना महाराष्ट्र बिजनेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योगतारा पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रात त्यांची पकड मजबुत आहे त्यामुळेच मनोज खेडकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सुध्दा अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत प्रामुख्याने सर्वांच्या सेवेसाठी शासनाची मिनीबस सेवा सुरू केली असून पर्यटन वाढीसाठी अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान मिनीट्रेनची शटल सेवा त्यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली आहे. या महत्वाकांक्षी कामात यश संपादन केले.अशक्य कामे पूर्ण करणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे परंतु आजतागायत कधीही प्रसिद्धी मिळावी यासाठी पुढाकार घेतला नाही. प्रसिद्धी पासून खूपच लांब आहेत.
‘उद्योगतारा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण जो अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद!सुक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायीकांच्या (MSME) विभागातील व्यावसायीकांना महाराष्ट्र बिजनेस क्लबतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आमचा व्यवसाय हा सुक्ष्म व लघु याच्यामध्ये कुठेतरी आहे. व्यवसाय फार मोठा नाहीये परंतु कामाचा दर्जा या निकषावर बहुतेक आमची निवड झाली असावी. मागील वर्षी आमच्या कंपनीने राज्य उत्पादन शुल्क भवनाची इमारत बांधली. त्या इमारतीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उत्कृष्ठ इमारतीचा पुरस्कार मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळाला होता. त्याची दखल ‘उद्योगतारा’ पुरस्कारासाठी निवड करताना घेतली गेली असावी.
पुरस्कार मिळाला म्हणुन आम्ही कोणी फार मोठे उद्योजक आहोत असे नाही. मोठा उद्योजक बनण्यासाठी अजुन खुप प्रवास बाकी आहे, याची आम्हाला जाणीव आहे.
पंधरा वर्षांपुर्वी माथेरानचे दस्तुरी येथील एमटीडीसीचे रिसाॅर्ट नुतनीकरण करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही ते रिसाॅर्ट महाराष्ट्रातील एमटीडीसीच्या इतर ठिकाणी असलेल्या रिसाॅर्टपेक्षा फार वेगळे, सुंदर बनवल्याबद्दल त्या कामाची त्यावेळी मा. पर्यटन मंत्री व एमटीडीसीचे एम.डी. यांनी दखल घेतली व महाराष्ट्रातील एमटीडीसीचे इतर रिसाॅर्ट हे माथेरानच्या रिसाॅर्टसारखे वा त्यापेक्षा आणखी चांगले बनवण्याचे निश्चीत केले. आज महाराष्ट्रातील एमटीडीसीची बहुतेक रिसाॅर्ट छान झाली आहेत. त्याची सुरुवात आमच्याकडून झाली याचा आनंद आहे. माथेरान, महाबळेश्वर, भंडारदरा, खारघर, लोणावळा या ठिकाणची रिसाॅर्ट करण्याची संधी आम्हाला मिळाली.
———————————————————-
आज ‘डेल्टाटेक्स’ विविध प्रकल्पांचे काम करत आहे. त्यामधे हाॅस्पिटल, काॅलेज, शाळा, न्यायालय व इतर इमारतींचा समावेश आहे.
मी माझ्या आनंददायी प्रवासाच, यशाच श्रेय मा. गव्हाणकर सर, माझे आई वडील आणि शाळेतील माझे शिक्षक यांना देईन. मला ‘चांगल शिक्षण’ मिळाल म्हणुन मी या व्यवसायात येऊ शकलो. माथेरानला ‘सरस्वती विद्या मंदिर’ ही शाळा नसती तर ज्या परिस्थितीत आम्ही होतो त्या परिस्थितीत माथेरान बाहेर जाऊन शालेय शिक्षण घेऊच शकलो नसतो. शालेय शिक्षणातील चांगल्या कामगीरीची दखल स्व. जीमी लाॅर्ड यांनी घेतली. अकरावी ते इंजीनिअरींग पदवी मिळेतोपर्यंत मला शिष्यवृत्ती मिळेल हे पाहील. स्व. पी. एन. अमरसी यांनी सहा वर्ष शिष्यवृत्ती दिली. जर शिकलो नसतो तर? असा विचारदेखील अंगावर काटा आणतो. पण शिक्षणात लक्ष दिल तर जीवनमान कितीतरी उंचीवर नेता येत.
…मनोज खेडकर—उद्योजक