महाराष्ट्र दिनी पोलादपूरमध्ये मनसेचं आमरण उपोषण – नगरपंचायत आणि शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात दर्पण दरेकर आणि ओंकार मोहिरे यांचं आंदोलन

महाराष्ट्र दिनी पोलादपूरमध्ये मनसेचे आमरण उपोषण
पोलादपूर (शैलेश पालकर) :
गेल्या काही वर्षांत पोलादपूर शहर आणि नगरपंचायती संदर्भातील विविध प्रश्नी उपोषणाद्वारे आंदोलन करून जनतेसह प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर यांनी  महाराष्ट्र दिनी पोलादपूर नगरपंचायतीच्या भ्रष्ट व बेकायदेशीर कारभाराविरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्वाणीचा इशारा दिला असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार मोहिरे हेदेखील रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारविरोधात याच मंडपात आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीमुळे प्रशासन उपोषणस्थळी फिरकले नाही तर पोलादपूरकर जनता देखील या आमरण उपोषणाबाबत अनभिज्ञ असल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले आहे.
पोलादपूर नगरपंचायतीला विविध प्रश्नांवर कारवाई करण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्रव्यवहार करण्यात येऊनही नगरपंचायत प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला दुर्लक्षित करून हितसंबंध जोपासण्यास प्राधान्य दिल्याच्या अकार्यक्षम भूमिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर हे उपोषणास बसले असून त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपास रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यालगत मंडप उभारून उपोषण सुरू केले आहे. याच मंडपामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी देखील आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
ओंकार मोहिरे यांनी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या अनेक नियमबाह्य कारभाराचा पाठपुरावा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्याकडे 46 निवेदनांद्वारे केला. या संदर्भात रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आणि पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीतील विविध निर्णयांबाबत अद्याप कारवाई न करणाऱ्या पोलादपूर पंचायत समिती शिक्षण विभागाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा देऊनही पंचायत समिती शिक्षण विभागाने रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी पुनिता गुरव यांनी दिलेल्या आदेशांना जुमानले नाही. यामुळे उपोषणाचा इशारा दिल्यानुसार मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी देखील आमरण उपोषण सुरू केले आहे.
पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बांधलेल्या मंडपामध्ये आज गुरूवार दि. 1 मे 2025 रोजी सकाळी पावणेबारा वाजता दर्पण दरेकर आणि ओंकार मोहिरे यांनी उपोषणास सुरुवात केली. दिवसभरात तहसिल कार्यालय, पोलीस, नगरपंचायत प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीमुळे दोन्ही उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाकडे सपशेल पाठ फिरवली. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरातील जनतेला या आमरण उपोषणाची कल्पना नसल्याने दोन्ही उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना तुरळक लोकांनी पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाक्षरी देत उपस्थिती दर्शविली. 
शुक्रवारी आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही उपोषणकर्त्यांच्या वैद्यकीय तपासणीसह नगरपंचायत पोलादपूर तसेच पंचायत समिती पोलादपूर प्रशासनांकडून दखल घेण्यात येईल आणि उपोषणकर्त्यांचे प्रश्न जाणून घेऊन कारवाईचे आश्वासन न देता ठोस कारवाईची भूमिका प्रशासनाकडून घेतली जाईल अशी अपेक्षा मनसे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर आणि मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी व्यक्त केली आहे.
दोन्ही तालुकाध्यक्षांच्या आमरण उपोषणस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी  मनसे शहर उपाध्यक्ष प्रफुल पांडे, मनसे शहर उपाध्यक्ष मुस्ताक मुजावर, तालुका सचिव गणेश कासुर्डे, शहर अध्यक्ष प्रवीण पांडे,शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड,विभाग अध्यक्ष अभय मोरे, निखिल उतेकर, अथर्व शिंदे आदींनी उपस्थित राहून उपोषणाच्या हेतूबद्दल जनतेमध्ये माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading