महायुती सरकारच्या पहिल्या बजेटमधून मोठ्या घोषणा; शेतकरी, महिला, युवा आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद

महायुती सरकारच्या पहिल्या बजेटमधून मोठ्या घोषणा – शेतकरी, महिला, युवा आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महायुती सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा महाबजेट तब्बल 1 तास 9 मिनिटे सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी “लाडकी बहीण” योजना, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, तसेच मुंबईसह राज्यभरात पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या या बजेटमधील 10 महत्त्वाच्या घोषणा –
१. मुंबईत सात आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रे
मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नवी मुंबई, वडाळा, खारघर, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, विरार आणि बोईसर येथे सात आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रे उभारली जाणार आहेत. ही केंद्रे बीकेसीसारखी विकसित करून मुंबईला जागतिक व्यापार केंद्र म्हणून उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.
२. मुंबई, पुणे, नागपूरसाठी नवीन मेट्रो प्रकल्प
राज्यातील मोठ्या महानगरांमध्ये 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित केले जातील. पुढील पाच वर्षांत 237.5 किमी मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. 2025 मध्ये मुंबईत 41.2 किमी, पुण्यात 23.2 किमी आणि नागपुरात 43.80 किमी मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.
३. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतिम टप्प्यात
उलवे येथे उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85% काम पूर्ण झाले असून, एप्रिल 2025 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
४. ‘सर्वांसाठी घरे’ योजनेस गती
राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. तसेच, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 20 लाख घरांसाठी 50,000 रुपये अनुदानवाढ करण्यात येईल.
५. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
६. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर
शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित योजना आणली जाणार आहे. यामुळे उत्पादन वाढ, शेतीमालाच्या विक्रीसाठी चांगली बाजारपेठ आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होईल.
७. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला चालना
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत येत्या दोन वर्षांत 2.13 लाख शेतकऱ्यांना 255 कोटींची मदत देण्यात येईल.
८. राज्य महामंडळाच्या 6,000 बस सीएनजी/एलएनजीमध्ये बदलणार
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र महामंडळाच्या 6,000 डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्यात येणार आहे.
९. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्प
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे.
१०. लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद
महिला सबलीकरणासाठी महत्त्वाची ठरणारी “लाडकी बहीण” योजना पुढील आर्थिक वर्षात 36,000 कोटींच्या निधीसह राबवली जाणार आहे.
या महाबजेटमधील घोषणा पाहता महायुती सरकारने शेतकरी, महिला, तरुण, उद्योजक आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. आगामी वर्षांत या घोषणा प्रत्यक्षात कशा येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading