महायुतीच्या विजयामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही : रविंद्र चव्हाण

Dharyashil & Chavhan
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
महायुतीचा प्रचारप्रमुख म्हणून आपला सर्वत्र प्रचार सुरु आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी बंडखोरी झाली त्या-त्या ठिकाणी पक्षाने बंडखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्याबरोबर पक्षाचा मतदार गेला नाही आणि कार्यकर्तेही गेले नाहीत. बंडखोर एकटे पडले आहेत. त्यामुळे महायुतीच्या विजयामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी खात्री असून महायुतीच्या सर्व जागा चांगल्या फरकाने जिंकून येतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.
भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या अलिबागमधील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, अॅड. महेश मोहिते, सतीश धारप, बिपीन म्हामूणकर, मिलींद पाटील, गिरीश तुळपुळे, गीता पालरेचा, राजेश मपारा, हेमंत दांडेकर, सतीष लेले, वैकुंठ पाटील आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मंत्री रवींद्र पाटील पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे. महायुतीचा प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आपण इतर पक्षांच्या एक पुढे असणे गरजेचे आहे. अलिबाग-मुरुडमधील राजकीय परिस्थितीत आपल्या बरोबरच्या एका सहकाऱ्याने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपचा कार्यकर्ता तसेच आपला मतदारही एका विचारधारेवर चालणारा आहे. त्यामुळे पक्षाने आपल्याला महायुतीमध्येच काम करण्याचे आदेश दिले असून सर्वांनी महायुतीमध्ये काम करावे असे आवाहन चव्हाण यांनी केले.
गेली वर्षानुवर्षे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने शतप्रतिशत भाजपासाठी काम केले आहे. बुथ लेवलवर सर्वांनी काम केले आहे. त्यामुळे प्रत्येक बुथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत दिशाभूल होण्याच्या शक्यता असते. प्रत्येक प्रमुख पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्त्याला भेटू शकत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे कदाचित सोयरिक निर्माण झालेली असते. असे असली तरी ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची आहे.
उमेदवार कोण आहे हे न पहाता, महायुती आहे हे लक्षात ठेवून काम करावे. छोट्या निवडणुकांमध्ये अनेक वेळी पक्ष वाढीच्या प्रयत्नांमध्ये आपल्या आपसात, काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होत असतात. मात्र यावेळी थोडा उदात्त विचार करून या निवडणुकीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.
महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांची निशाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविली पाहिजेत. घरोघरी प्रचार करताना कार्यकर्त्यांमध्ये एक समन्वयाची भूमिका ठेवून समोरून आपल्याला काय वागणूक मिळतेय याचा विचार करायचा नाही. या गडबडीत मानापमानाच्या गोष्टी सुरु होतात. त्यामुळे येत्या बारा दिवसात ही आपलीच निवडणूक समजून काम करायचे आहे, ही भूमिका ठेवून काम करायचे आहे, असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रत्यांना दिला. भाजपा जिल्हा कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजातील अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते सतीष धारप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा पक्ष कार्यालयाचे उद्घान मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तर विविध पदांवर नियुक्ती झालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्तीचे पत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading