महाड विधानसभा मतदार संघामध्ये तीन वेळा बिगर काँग्रेसी उमेदवाराला आमदारकी आणि चौथ्यावेळी काँग्रेसी विचारांच्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रघात असताना परिवर्तन घडविणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य केवळ साडेतीन ते चार हजारांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. परिवर्तनाच्या संकेतामध्ये पहिल्यांदा मताधिक्य मिळविता आले नसल्याचा तर दुसऱ्यावेळी मताधिक्य मिळविल्याचा संकेत मतदार जनतेकडून दिला जात असल्याचे दिसून येत असले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील मताधिक्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळत असल्याचे आतापर्यंतची आकडेवारी सांगत आहे.
पोलादपूर तालुक्यातील काँग्रेसकडून 1957 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ.करमरकर,1962 च्या निवडणुकीत जनसंघाकडून लक्ष्मण मालुसरे, 1967 मध्ये शेकापक्षाकडून मोरे, 1978 मध्ये अपक्ष पी.जी.घाटगे, 1990मध्ये अपक्ष रतनलाल देसाई 1995 मध्ये अपक्ष बाबूराव भोसले आणि काँग्रेसकडून 1999 मध्ये सुरेश जाधव असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जनतेचा कौल आजमाविण्यासाठी उभे होते.
परिवर्तनाच्या काळातील विधानसभा निवडणुकीच्या लढती पाहता 1962 मध्ये शं.बा.सावंत विरूध्द सखाराम साळुंखे यांना प्रत्येकी समसमान 12 हजार 644 मतदान होऊन चिठ्ठीवर शं.बा.सावंत निवडून आले. त्यानंतरच्या 1967च्या लढतीत शं.बा.सावंत 23 हजार 221 मते यांच्याविरोधातील उमेदवार समाजवादी पक्षाचे किशोर पवार 21 हजार 672 मते मिळवून फक्त 1449 मतांनी पराभूत झाले. त्यानंतर 1972 व 1978 च्या निवडणुकीत नाना पुरोहित प्रजा समाजवादी व जनता पक्षामधून सलग दोनवेळा निवडून आले. 1980 मध्ये किशोर पवार हे जनता पार्टीचे उमेदवार 14 हजार 35 मते आणि अपक्ष शांताराम फिलसे यांना 11 हजार 658 मते तसेच काँग्रेस अर्सचे अरूण देशमुख यांना 5 हजार 742 मते मिळून झालेल्या मतविभागणीमुळे काँग्रेसचे चंद्रकांत देशमुख विजयी झाले.
त्यानंतरच्या 1985च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाने शांताराम फिलसे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने शं.बा.सावंत यांचे पुत्र सुधाकर सावंत यांना उमेदवारी दिली. यावेळी अरूण देशमुखांनी अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना 3 हजार 788 मते मिळून सुधाकर सावंत यांना 31 हजार 391 मते मिळून शांताराम फिलसे 32 हजार 40 मते मिळवून विजयी झाले. 1990मध्ये शिवसेना पक्षातर्फे प्रभाकर मोरे महाड विधानसभा निवडणुकीचे उमेदवार झाल्यानंतर सुधाकर सावंत यांनी 29 हजार 110 मते कडवी झुंज दिली. मात्र, मतदानानंतर मृत्यू झालेले शांताराम फिलसे यांनी 24 हजार 937 मते मिळविली. यामुळे प्रभाकर मोरे यांनी 32 हजार 220 मते मिळवून शिवसेना विजयपर्वाची सुरूवात केली.
1995 मध्ये शिवसेनेचे प्रभाकर मोरे 41 हजार 705 मते विजयी यांच्याविरोधात काँग्रेसने अरूण देशमुख 21 हजार 123 मते यांना उमेदवारी दिली. पण सुधाकर सावंत यांनी अपक्ष उमेदवारी करून 19 हजार 94 मते घेत बंडखोरी केल्याने प्रभाकर मोरे यांच्या सहज विजयाला हातभार लागला. बाबाजी पवार यांनी शेकापक्षाची 8 हजार 483 मते राखल्याने काँग्रेसला 1980 नंतर पुन्हा यश मिळण्यासाठी माणिक जगताप या नव्या दमाच्या उमेदवाराबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या.
मात्र, त्यावेळी 1999 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडून पोलादपूरचे सुरेश जाधव यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी लढवली आणि त्यांना 4 हजार 142 मते मिळाली तर शिवसेनेचे प्रभाकर मोरे 46 हजार 212 मते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढविणाऱ्या माणिक जगताप 42 हजार 965 मते यांच्याविरोधात 3 हजार 247 मताधिक्य घेत स्वत:च्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. यावेळी लोकसभेसोबत विधानसभेचीही निवडणूक होत असल्याने रत्नागिरी लोकसभा मतदार संघामध्ये असलेल्या महाड विधानसभेची मतमोजणी रत्नागिरी मुख्यालयाच्या ठिकाणी केली जात होती.
फक्त महाड व पोलादपूर तालुक्यांचा समावेश असलेल्या महाड विधानसभा मतदार संघाची शेवटची निवडणूक 2004 मध्ये झाली आणि चौथ्यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी करणारे प्रभाकर मोरे 53 हजार 193 मते यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव जगताप यांनी 56 हजार 792 मते घेऊन विजय प्राप्त करीत शिवसेनेला 16 वे वरिस धोक्याचे ठरविले. यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाड व पोलादपूर तालुक्याला माणगाव तालुक्याचा अर्धाअधिक भागदेखील जोडला गेला. त्यामुळे या वाढलेल्या मतदारसंघाच्या रचनेवर महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नेत्यांचे नियंत्रण राहिले नाही. परिणामी, 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. माणिक जगताप यांचा पराभव शिवसेनेचे भरत गोगावले यांनी केला आणि ते आमदार झाले आणि 2014 काँग्रेसचे माजी आ. माणिक जगताप यांचा शिवसेनेचे आ.भरत गोगावले यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. तिसऱ्यांदा 2019 मध्ये आ.गोगावले आणि माजी आ.माणिक जगताप आमनेसामने उभे ठाकल्यानंतर आश्चर्यकारकारित्या 21 हजार 256 मताधिक्याचा आकडा कायम राहून आ.गोगावले तिसऱ्यांदा विजयी झाले.
यानंतर 2021 मध्ये माणिकराव जगताप यांचा अल्पशा आजाराने मृत्यू ओढवला तसेच शिवसेनेमध्येदेखील बंडखोरी होऊन शिवसेना व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष तयार झाले.2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी महाड विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खा.सुनील तटकरे यांचे मताधिक्य पावणेचार हजारांच्या दरम्यान आले असल्याने परिवर्तनाचा फरक एवढाच असल्याचे मानणे कितपत योग्य ठरेल हे येणारा काळच ठरवेल.
मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी माणिकराव जगताप यांच्या पश्चात त्यांची कन्या स्नेहल जगताप ही काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहे तर चौथ्यांदा विधानसभा निवडणुक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासह लढताना मंत्रीपद मिळविण्यासाठी भरतशेठ गोगावले सज्ज झाले आहेत. परिवर्तनाचे शिवसेनेचे 16 वे वरिस धोक्याचे आहे की परिवर्तनाचा आकडा साडेतीन ते चार हजारांच्या घरात राहिल हे मतदानानंतरच्या मतमोजणीमध्ये उघड होणार आहे.
194-महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये 18 ते 19 वयोगटातील लोकसंख्या 13 हजार 717 या वयोगटामध्ये 4 हजार 645 मतदार आहेत. 20 ते 29 वयोगटातील लोकसंख्या 75 हजार 236 असून यापैकी 53 हजार 227 मतदारांची नोंदणी झाली आहे. 30 ते 39 वयोगटातील लोकसंख्या 71 हजार 956 असून या वयोगटातील मतदारांची संख्या 61 हजार 293 आहे. 40 ते 49 वयोगटातील लोकसंख्य 58 हजार 286 असून या वयोगटात 57 हजार 815 मतदारांची नोंदणी झाली आहे. 50 ते 59 वयोगटातील लोकसंख्या 40 हजार 28 असून मतदार संख्या मात्र 46,431 असल्याचे 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये दिसून येत आहे. 60 ते 69 वयोगटातील लोकसंख्या 27 हजार 426 असून 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये या वयोगटातील 38 हजार 117 मतदारांची नोंद दिसून येते. 70 ते 79 वयोगटातील लोकसंख्या 16 हजार 560 असून 21 हजार 661 मतदार संख्या दिसून येते.
80 वर्षावरील लोकसंख्या 6 हजार 536 असून अंतिम मतदार यादी मध्ये 13 हजार 595 अशी या वयोगटातील मतदारांची नोंद आहे. एकूणच महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये 18 वर्षावरील 3 लाख 13 हजार 745 लोकसंख्या असताना 2 लाख 92 हजार 784 मतदारांची नोंद 2024 च्या सुधारित अंतिम मतदार यादीमध्ये दिसून येत आहे. वयोगटानुसार मतदारांच्या संख्येमुळे मतदारांच्या पसंतीचे उमेदवार कोणत्या वयोगटातील असतील अथवा कोणत्या वयोगटातील मतदारांना कोणत्या वयोगटाचे उमेदवार नकोसे असतील, याचा अंदाज बांधता येतो.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.