महाड एस.टी.आगारातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. मात्र, एस.टी. आगाराचे अधिकारी वाहक आणि चालकांना प्रतिसाद देत नसल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बहुजन हिताय। बहुजन सुखाय। आहे की मनस्तापासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, आता सातत्याने मुंबई बोरीवली व ठाणे अशा गाडयांच्या फेऱ्या बसमध्ये बिघाड झाल्याने खासगी वाहनांना प्रोत्साहनासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांचा कट आहे काय, अशीही शंका प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
पोलादपूर बोरिवली एसटी बस पोलादपूर सोमवारी सकाळी सुटली. महाड, माणगाव येथे प्रवासी घेत इंदापूर येथील स्थानकात चहा नाश्ता करायला थांबली. चहा नाश्ता करून झाल्यावर बस सुटण्याच्यावेळी बसचा फुगा फुटला आहे, असे सांगून सर्व साठ प्रवासी दुसऱ्या गाडयांमध्ये बसविण्याचा प्रयत्न चालक व वाहक यांनी सुरू केला. अर्धा पाऊण तास गाडया थांबविण्यासाठी प्रयत्न केले आणि सोमवार असल्याने सर्वच एसटी बस प्रवाशांनी तुडुंब भरून येत होत्या म्हणून एक दोन प्रवासी मार्गस्थ होऊ लागले. चालक व वाहक यांनी दुसरी बस मागविण्याऐवजी प्रवाशांना दमदाटी करून इंदापूर येथील बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रक महिलेला सांगून बस मागवायला सांगा असे सांगून प्रवाशांना तिकडे पाठविले.
महिला वाहतूक नियंत्रक भडकल्या आणि त्यांनी प्रवाशांना चालक व वाहक यांना बोलावून घेण्यास सांगितले. वाहक व वाहतूक नियंत्रक महिलेची खडाजंगी झाली. प्रवाशांची गैरसोय संतापजनक झाली असल्याने प्रवासी खासगी तसेच मिळेल त्या वाहनाने आप आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागले. काहींना चालक व वाहक यांनी एसटी बसमध्ये बसवून दिले. एका महिलेला तिच्या चार वर्षे वयाच्या मुलीचेही तिकिट घ्यायला वाहकाने भाग पाडले होते त्या महिलेला मुलीसह दुर्सया एसटी बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागणार असल्याने तीदेखील संतापली होती.महाड एसटी डेपोच्या लांब पल्ल्याच्या गाडया नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असून प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाचे महामंडळाच्या कर्मचारी वर्गाला काहीच सोयरसुतक नसते हे प्रत्येक वेळी दिसून आले आहे.
पोलादपूर स्थानकापासून 100 मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस मोठया संख्येने रोज उभ्या केल्या जात असून महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या गाडया नादुरूस्त झाल्याचे अचानक सांगून प्रवाशांचा महामंडळाच्या वाहतूकीवरील विश्वास उडविण्याचे काम कर्मचारी अधिकारी यांच्याकडून केले जाऊन खासगी प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.