पोलादपूर ( शैलेश पालकर ) : महाड शहरातील पूरस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा तातडीने उपसा करण्याची आवश्यकता आजमितीस दूर्लक्षित करण्यात आली आहे. दुसरीकडे महाडच्या पूरस्थितीवर गाळउपसा करण्याचा जोर मात्र कायम असल्याचे दिसून येत असल्याने पुराच्या पाणीप्रश्नावर वाळूरूपी गाळाचा अनाकलनीय संबंध अर्थपूर्ण वाटत असल्याचीच चर्चा दोन्ही तालुक्यात सर्वत्र होत आहे.
1989, 2005 आणि 2021 या वर्षीच्या महाडच्या महापुराबाबत झालेल्या चर्चांना 2021 नंतर मात्र वैचारिक, राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक मानवसेवेचे रूप प्राप्त झाले. मात्र, पुरस्थिती संपल्यानंतर या मानवसेवेचे चाक चक्क गाळरूपी वाळू उपशामध्ये अडकल्याचे दिसून येऊ लागले. गेल्या वर्षी 2022मध्ये पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणाच्या बॅकवॉटरचा पुर्णपणे उपसा करून सावित्री नदीच्या पात्राचे पाणी धरणात अधिकाधिक रोखून धरण्याचा प्रयत्न बव्हंशी यशस्वी झाला होता.
पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आलेले असे आहे. या धरणाची लांबी 320 मीटर्स असून सांडवा 121.84 मीटर्स आहे. 8 सांडव्यांवरील दरवाजे 12 मीटर्सचे प्रत्येकी आहेत. उच्चालक मोटर क्षमता 10 अश्वशक्ती आहे. धरणाची क्षमता 40 मे.टन आहे. पाणीसाठा 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर तर 55 मीटर पातळीवर 16.49 दशलक्ष घनमीटर असतो. मृतसाठा 3.6 दशलक्ष घनमीटर असून 61.50 पातळीवर वापरण्यायोग्य पाणीसाठा 26.32 दशलक्ष घनमीटर आणि 55 मीटर पातळीवर पूर्ण संचय पातळी 61.50 मीटर आहे. सांडव्यांची पातळी 55 मीटर आहे. भिंतींची पातळी 64.70 मीटर आहे.
धरणाची महत्तम उंची 33.615 मीटर असून पाणलोटक्षेत्र 197.257 चौ.कि.मी इतके आहे. या धरणामुळे 2.70 चौ.कि.मी. बुडीत क्षेत्र झाले आहे. सांडव्यांची क्षमता 3248.134 घनमीटर प्रतिसेकंद एवढी आहे. या धरणाची आपत्कालीन दरवाजे, विद्युत जनित्र आणि उच्चालक क्षमता अशी ठळक वैशिष्ठयेही आहेत. पूरकाळात धरण भरलेले असताना 58.10 मीटर पाण्याची पातळी असते. सध्या येथील पाण्याची पातळी 51.50 मीटर एवढी असून 43 आरएलपर्यंत पाण्याची पातळी खाली करण्याची परवानगी आहे.
मात्र, गेल्यायावर्षी धरणाच्या बॅक वॉटरची पातळी 43 आरएलपेक्षाही कमी करण्यासाठी सर्व सांडव्यांसह सर्व्हिस गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या 61.50 मीटर पातळीवर 29.95 दशलक्ष घनमीटर पाणीसाठयापैकी 22 मिलीयन क्युसेक पाणीसाठा धरणाचे सहा सांडवे खुले केले असताना अस्तित्वात होता. या सहा सांडव्यासोबतच दोन सर्व्हिस गेटसदेखील उघडण्यात आल्याने साधारणपणे प्रतिसेकंद 25946 घनमीटर पाणीसाठयाचा विसर्ग झाला.
महाड शहर व परिसरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत समितीच्या बैठकीमध्ये रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा पाणीसाठा पूर्णत: रिकामा असल्यास अतिवृष्टीकाळामध्ये बॅकवॉटरची धोक्याची पातळी भरून ओव्हरफ्लो होऊन महाडच्या दिशेने वाहणाऱ्या नदीपात्राचा प्रवाह कमी असेल, असे मत प्रस्तुत प्रतिनिधीने विविध बैठकांवेळी व्यक्त केले होते. याअनुषंगाने मे 2022 पासून बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास सुरूवात होऊन संपूर्ण बॅकवॉटरचा जलाशय रिकामा करण्यास सुरूवात झाली होती.
मात्र, यंदा बॅकवॉटरचा साठा पुर्णपणे तुडूंब भरलेला असून महाड येथील सावित्री नदीपात्रातील वाळुरूपी गाळ उपसा जसा वेगाने होत आहे. त्या तुलनेमध्ये रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा विसर्ग करण्याकडे सपशेल दूर्लक्ष झाले आहे. परिणामी, भर उन्हाळयामध्ये रानबाजिरेपासून पोलादपूर व त्यापुढील गावांमध्ये सावित्री नदीचे पात्र सर्वत्र कोरडे पडले असून नदीलगतच्या कुटूंबियांना कपडे धुणे भांडी घासण्यासारख्या कामांसाठीदेखील पुरेसे पाणी नदीपात्रामध्ये शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या नदीपात्रामध्ये काही ठिकाणी वाळूरूपी गाळउपसा मोठया प्रमाणात सुरू असल्याने या कामात रानबाजिरे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास अडथळा होण्याची शक्यता असल्याने यंदा जाणीवपूर्वक रानबाजिरे धरणातील बॅकवॉटरचा साठा कमी करण्यास विलंब केला जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
पोलादपूर तालुक्यात गाळउपसा करणाऱ्यांचा वाळूउपसा करण्याचा व्यवसाय असल्याने इरिगेशन विभागाचे काम कोणते आणि महसूल विभागांतर्गत गौणखनिज उत्खननाचे काम कोणते, हे महसूली कर्मचाऱ्यांना समजून येत नसण्याचा वेगळाच अर्थ असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत असताना या सर्व घटनाक्रमात रानबाजिरे धरणाचा विसर्ग वेळीच न झाल्यास महाड तसेच पोलादपूरचा अतिवृष्टी काळात पुराचा धोका तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.