ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या २०२४ च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकानुसार (CPI), डेन्मार्कने सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात कमी भ्रष्ट देशाचा किताब मिळवला आहे. त्यानंतर फिनलंड, सिंगापूर, न्यूझीलंड आणि लक्झेंबर्ग हे देश अनुक्रमे अव्वल पाच स्थानी आहेत.
भारताच्या क्रमवारीत घसरण
भारताचा भ्रष्टाचार निर्देशांकातील क्रमांक ९३ वरून ९६ वर घसरला आहे. भारताला यावर्षी १०० पैकी ३८ गुण मिळाले, तर २०२३ मध्ये ३९ आणि २०२२ मध्ये ४० गुण मिळाले होते. गेल्या दहा वर्षांत भारताने २०१५ मध्ये ७६ व्या स्थानावर सर्वोत्तम कामगिरी केली होती, मात्र त्यानंतर भारताची स्थिती सतत घसरत आहे.
शेजारी देशांची स्थिती
चीन – ४३ गुणांसह ७६ व्या स्थानी (भारतापेक्षा चांगली कामगिरी)
पाकिस्तान – २७ गुणांसह १३५ व्या स्थानी (२०२३ मध्ये १३३ वे)
श्रीलंका – १२१ व्या स्थानी
बांगलादेश – १४९ व्या स्थानी (भ्रष्टाचार वाढ)
जगातील सर्वात भ्रष्ट देश कोण?
यंदाच्या निर्देशांकात दक्षिण सुदान सर्वात भ्रष्ट देश ठरला असून त्याला फक्त ८ गुण मिळाले आहेत. त्यानंतर सोमालिया (९ गुण), व्हेनेझुएला (१० गुण), सीरिया (१२ गुण) आणि लिबिया (१३ गुण) यांचा समावेश आहे.
युरोपियन देशांचा उत्तम परफॉर्मन्स
युरोपातील डेन्मार्कने सर्वाधिक ९० गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर फिनलंड (८८ गुण), सिंगापूर (८४ गुण), न्यूझीलंड (८३ गुण) आणि लक्झेंबर्ग (८१ गुण) हे देश देखील टॉप-५ मध्ये आहेत.
भारतासाठी धोक्याची घंटा?
गेल्या काही वर्षांपासून भारताच्या भ्रष्टाचार निर्देशांकात सातत्याने घसरण होत आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांची कमी प्रभावीता यामुळे भारताची स्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत ठरत आहे.