कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील टाटा पॉवर पंप स्टोरेज प्रकल्पासाठी ब्लास्टिंग परवानगी संदर्भात १० जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीस आदिवासी समन्वय समिती कर्जत, आदिवासी महादेव कोळी समाजोन्नती मंडळ कर्जत तसेच मे साल्नो एकस्प्लोसिव अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (सिकंदराबाद, तेलंगणा) कंपनीचे अधिकारी आणि एकूण ४० ग्रामस्थ उपस्थित होते.
मौजे भिवपुरी टाटा कॅम्प गट नं. १ मध्ये कठीण दगड फोडण्यासाठी कंपनीने दि. १२ एप्रिल २०२५ रोजी ब्लास्टिंग परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार तहसीलदार कर्जत कार्यालयाकडून विस्फोटक नियम २००८ अंतर्गत १०३(३) नियमानुसार ग्रामस्थांच्या हरकतीसाठी दि. ७ मे २०२५ रोजी नोटीस बजावण्यात आली होती.
या प्रक्रियेअंतर्गत दि. ६ जून २०२५ रोजी ग्रामसभेत ठराव घेतून आणि आदिवासी संघटनांच्या सहकार्याने १९५ स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्तिशः आपली हरकत दाखल केली. त्यांनी ही परवानगी सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचे सांगत प्रकल्पास तीव्र विरोध नोंदवला.
१० जून रोजी झालेल्या सुनावणीत, नियमांचे संभाव्य उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, विस्फोटकांच्या ना-हरकत निकष, पर्यावरणीय परवानग्या, भूगर्भातील पाण्याचा प्रभाव, तलाव व बोरवेलवरील परिणाम यासारख्या गंभीर मुद्यांवर चर्चा झाली. संबंधित शासकीय परिपत्रके, जनसुनावणी अहवाल व पर्यावरण मंत्रालय मान्य अटी/अहवाल जोडून सादर करण्यात आले.
या जनहिताच्या मुद्द्यावर ग्रामस्थ आणि आदिवासी संघटनांनी एकजुटीने आवाज उठवल्याबद्दल स्थानिक व सामाजिक स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.