‘छत्रपती शिवाजी महाराज’ मंदिराचे (शक्तीपीठ) लोकार्पण

भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा येथील 'छत्रपती शिवाजी महाराज' मंदिराचे (शक्तीपीठ) लोकार्पण
ठाणे :
देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे (शक्तिपीठ) लोकार्पण झाले. यावेळी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, प.पू. बालयोगी सदानंद बाबा, ह.भ.प डॉ.कैलास महाराज निचिते, राष्ट्रसंत नीलकंठ शिवाचार्य, प.पू. आलोकनाथ महाराज, खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार दौलत दरोडा, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौघुले, शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, श्री.विश्वनाथ पाटील, नरेंद्र पवार, जितेंद्र डाकी, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस. स्वामी, श्री.अनंता भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास निचिते व राजू चौधरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराच्या संकल्पना व प्रत्यक्ष निर्माणाकरिता कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपल्या इष्ट देवतेचे मंदिरात जावून दर्शन घेवू शकतो. अतिशय सुंदर, भव्य दिव्य असे हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिराला सुंदर तटबंदी आहे, अतिशय चांगले बुरुज आहे, दर्शनीय प्रवेश मार्ग, बगीचा आहे. या मंदिराच्या माध्यमातून महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक आणि पुढे संभाजी महाराजांची वाटचाल असे अतिशय सुरेख प्रसंग उभे करण्यात आले आहेत. यातून प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
आई जिजाऊंच्या संस्कारांनी अन् आशिर्वादाने शिवबा घडले. त्यांच्या प्रेरणादायी शिकवणीतूनच शिवरायांनी मुघलांच्या आव्हानांचा प्रतिकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य फौजेविरुद्ध सर्वसामान्य जनतेतून शक्ती निर्माण केली आणि भगवा झेंडा फडकविला. छत्रपती शिवाजी महाराजांची 300 वी जन्मशताब्दी साजरी होत असताना देश घडविण्याच्या कार्यात आपले योगदान देवू या, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वर येथे देखील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पानिपत येथील लढाई सर्वांना माहितच आहे. महादजी शिंदे यांनी गाजविलेला पराक्रम सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणीही भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शक्तिपिठाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे भिवंडी-वाडा या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या शक्तिपिठाकडील येणाऱ्या सर्व मार्गांचे नियोजन उत्तमरित्या करावे, येथे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आवश्यक सोयीसुविधा तयार कराव्यात. याकरिता निधीची कमतरता पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading