भाजी विकता विकता अंगणवाडी सेविका ते वकील जीविता पाटील एक संघर्षमय प्रवास

Jeevita Patil
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
खरं तर प्रत्येकाचे जीवन तसे पाहिले तर कमी जास्त का होईना पण संघर्षमयी असतेच. पण म्हणून संघर्ष तरी किती करायचा? हा देखील प्रश्नचिन्हच. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुखं येत असतात आणि आपण त्या दुःखांचा सामना करीत पुढे जात असतो आणि सुखाला गवसणी घालतो पण हे करीत असताना जो संघर्षाचा काळ असतो तोच मुळात कठीण असतो कारण त्यावेळी त्यात जर तरलो तर तरलो नाहीतर आजुबाजूच्या शक्ती आपला कधी नाश करतील याचा नेम नसतो. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत त्यांचे आयुष्य देखील असंच आहे. अवघ्या 3 महिन्याची असताना जन्मदाती आई निघून गेली. मग 6 वर्षाची मोठी बहीणच आई बनून तिचा सांभाळ करू लागली.
आईशिवाय जगणारं हे बाळ काका चुलत्यांच्या देखरेखीखाली वाढू लागले. वडिलांनी अवघ्या वर्षभरात दुसरं लग्न केले. दिवस भरभर निघून जात होते वयाची ७ वर्षाची असताना लिहिण्याचा छंद लागला अगदी बालगीत लिहिण्यापासून आपल्या मोडक्या तोडक्या शब्दांत कल्पनेत असलेल्या आईला पत्र लिहू लागली. आणि ही सारी पत्र व बालगीते रायगड मधील दैनिक कृषिवल या स्थानिक वृत्तपत्रात त्या काळी म्हणजेच १९८८ साली बालांगण या सदराअंतर्गत दर रविवारी लहान मुलांच्या कविता, बालगीत व गोष्टी आणि लेख, कोडी अशा स्वरूपात राखून ठेवलेल्या पानावर छापून येत होत्या अर्थात त्या वेळी एस.एम.देशमुख हे संपादक होते तर उमाजी केळुस्कर हे लहान मुलांचे मोडके तोडके शब्द आणि यमक जुळविण्याचे काम करायचे आणि मग ते बालसाहित्य नावानिशी छापून येत होते. म्हणजेच लिखाणाची आवड त्या वयात त्यांनी जोपासली. मनात असंख्य प्रश्न होते इतरांची आई जेव्हा लेकरांवर माया करायची त्यावेळी हे लेकरू खूप आशेने आणि कुतुहलाने त्यांच्याकडे पाहायचे, मनातून आई नसल्याचे दुःख व्हायचे मग मनातलं दुःख लेखणीद्वारे कागदावर उतरू लागले. जेमतेम १२ वी पर्यंत शिक्षण झाले आणि मग घरातल्यांनी लग्न लावून दिले.
लग्नाचे कसलेच सोहळे अनुभवले नाही कारण फक्त 5 जणींनी पाच बोटे हळद लावून तयारी केली आणि एका मिनिडोअर मध्ये ८ जणं बसून अलिबाग येथील कोर्टात एकमेकांच्या गळ्यात माळा घालून पेढे वाटप केले आणि लग्नबंधनात बांधले गेले. इतरांचे लग्न ज्या विधी, सोहळे, प्रथा, परंपरा साजरे करून होताना पहायचे ते मात्र आपल्या नशिबात काहीच आले नाही याची खंतही न राहून आजही मनात कायम आहेच.लग्न झाल्यानंतर खूप चांगला पती आणि खूप प्रेमळ सासू रुपातील आई भेटल्याचा आनंद झाला आणि आई नसल्याची आत्तापर्यंतची मनातील पोकळी भरून आली. आत्ता कुठे सुखाचे दिवस पदरात आले होते. संसाराच्या वाटेवर चालत असताना परिस्थिती गरीब असल्याची खंत वाटत नव्हती कारण अतोनात प्रेम करणारा पती आणि सासू यांची भक्कम साथ होती. पेण मधून स्वस्त दरात भाजी विकत आणून ती भाजी कुसुंबळे गावात त्या विकू लागल्या आणि त्यातून आपल्या संसाराला हातभार लावत होत्या. दोन वर्षे भरभर निघून गेली आणि संसाराच्या या वेलीवर एक फुल उमलले. वाटले आयुष्यात आणखी काय हवंय आत्ता आपला संसार परिपूर्ण झाला आहे मुलाला मोठं करून खूप शिकवायचे हे स्वप्न त्या उभयतांनी पाहिलं जसे सगळेच आईवडील आपल्या मुलासाठी पहातात. सारे जग आणि सारे सुख पदरात असल्याचा अनुभव घेत असताना नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. मुलगा अवघा दीड वर्षाचा असताना अचानक पतीचे निधन झाले.
आयुष्यात यापेक्षा मोठं संकट आणि दुःख काय असेल? नियतीने आपला डाव साधला पण सासूचा खंबीर पाठिंबा त्या परिस्थितीतही त्यांना जगण्याची प्रेरणा देत होता. वयाच्या २१ व्या वर्षीच वैधव्यपण वाट्याला आले. जगावं की मरावं हा विचार त्यांच्या मनात आला पण सासूने त्यांना धीर देत आहोत त्या परिस्थितीत मुलासाठी लढावं ही शिकवण दिली आणि पुढे काय करायचे या विचारात असतानाच स्वतः सासूने त्यांना खांद्यावरचा पदर बाजूला करून दुखी होऊन रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे यासाठी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करावे ही सासूची इच्छा होती त्यासाठी स्वतः सासूने त्यांना सोबत घेतले आणि कोएसो. लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयात पेझारी येथील कॉलेजमध्ये गळ्यातील चैन गहाण ठेवून एफवाय.बी.ए या शैक्षणिक वर्षात ॲडमिशन घेतले. प्राचार्य मारुती भगत यांनी तसेच इतर प्राध्यापक वर्गांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. मात्र परिस्थिती बेताची आणि कमावणारे कुणीच नाही त्यातही मुलाची आणि सासूची जबाबदारी या सर्वाचा विचार करून त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. ज्या बसमधून मुले मुली कॉलेजला जात होते त्याच बसमधून जिविता पाटील या स्वस्त दरात भाजी खरेदी करण्यासाठी पेण येथे जात होत्या आणि आठवड्यातून जमेल तसे कॉलेजला जाऊन अभ्यास करीत होत्या. खर्च वाढला होता परिस्थिती साथ देत नव्हती म्हणून गावातच एक पतसंस्था होती ज्यात मोकळ्या वेळेत त्या सायकलवर प्रवास करून पिग्मी गोळा करण्याचे काम करीत होत्या.
एकीकडे कष्ट आणि दुसरीकडे अभ्यास या दरम्यात मुलाचेही शिक्षण सुरू झाले. जीविता पाटील यांनी कधीही हिंमत हरली नव्हती प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दाखविली आणि इकडे दरवर्षी प्रथम श्रेणीत पास होत त्यांनी बीए ची पदवी संपादन केली. त्यानंतर एच बी बीएड कॉलेज वाशी येथे बीएड करण्याचे ठरविले आणि तिथे देखील त्यांनी बीएड या शैक्षणिक वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. आत्ता कुठे आपल्या कष्टाला पूर्णविराम मिळेल आणि एखादी चांगली नोकरी मिळेल. या आशेत असतानाच नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डी.एड कॉलेजवर मला प्राध्यापिका म्हणून जॉब मिळाला. ज्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा आणि कठीण काळात साथ दिली अशा आयुष्यभर चूल फुंकणाऱ्या आपल्या सासूला सुखाचे दिवस देवू आणि त्यांच्या उपकाराची थोडी का होईना परतफेड करू या विचारात असताना अचानक पुन्हा एकदा नियतीने आपला डाव साधलाच आणि ज्यांच्या प्रेरणेने त्यांना पाठबळ मिळत होते त्या सासूला कॅन्सर झाला आणि हातातली सारी वाळू निसटून जावी अशी आयुष्यातील सर्व स्वप्न निसटून गेल्याने त्या त्या वेळेसाठी मात्र पुर्णतः खचून गेल्या. जेमतेम ६ महिने कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून काम पाहिले आणि सासूच्या सेवेसाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. दोन वर्षे सासूची सेवा केली आणि अखंड सुखदुःखात साथ देणारी त्यांची सासू नव्हे तर आई निघून गेली आणि पुन्हा एकदा आयुष्यात अंधार झाला.
एकटेपणाचे दुःख काय असते याचा अनुभव त्यांना आला पण सासूने तोपर्यंत त्यांना मनाने भक्कम केले होते. पुन्हा एकदा आयुष्याशी झगडायचे ठरले आणि त्याचवेळी म्हणजे २०११ मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत अंगणवाडी सेविका या पदासाठी भरती निघाली. त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अर्ज केला व कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर नवीन वाघविरा या गावामध्ये नोकरी मिळाली. एकीकडे मुलाचे शिक्षण आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत संपादन केली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला इतके मजबूत केले की त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. प्रथम श्रेणीत एम.ए. एज्युकेशन, एम.फिल ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी त्या पेझारी येथे राहू लागल्या. आपोआपच समाजसेवेची ओढ निर्माण झाली. समाजात आपल्यासारख्या अनेक दुःखी कष्टी स्त्रिया आहेत ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर त्या खचून जातात हे ओळखून आपल्यासारख्या महिलांना प्रेरणा देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे हे मनात आले आणि त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, शाखा खारघर येथे MSW (Master of social work) ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून एकल महिलांसाठी एक आदर्श म्हणून नावारूपास आल्या. मनात आणले तर एक अंगणवाडी सेविका काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जीविता पाटील.
महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना ठाणे येथील युनियनच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आणि अध्यक्ष एम . ए.पाटील सर तसेच सरचिटणीस ब्रुजपाल सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचे, उपोषणाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला. ठिकठिकाणी वेगवेगळ्या शाळा, हायस्कूल, कॉलेज नव्हे तर महाविद्यालय येथे त्यांना प्रेरणादायी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले जावू लागले. महिला दिनाला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावून महिलांना मार्गदर्शन करणे, मोठमोठ्या कार्यक्रमांचे निवेदन करणे, सामाजिक कार्यक्रमात चिफ गेस्ट म्हणून निमंत्रित करणे हे सारे सुरू असताना या धावपळीत त्या एकीकडे आपल्या मुलावर चांगले संस्कार करायला विसरल्या नाहीत. त्यांनी मुलाला कोएसो. ना ना. पाटील हायस्कूल पोयनाड येथे १० वी पर्यंत शिक्षण दिले.
पुढे मुलाला त्यांनी अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेज येथे ११ वी सायन्स ला प्रवेश घेतला. त्याने याच कॉलेजमध्ये BSCIT चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंग तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर हा ॲडव्हान्स कोर्स करून तो नुकताच corevision या कंपनीत जॉब करीत आहे. एका आईची जबाबदारी पार पाडीत असताना त्या ४८ मुलींच्या आई बनल्या आणि त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करू लागल्या. आजही त्या अंगणवाडी सेविका याच पदावर काम करीत आहेत. शासन त्यांची जबाबदारी घेईल न घेईल पण त्या मात्र आजही आपली जबाबदारी लीलया पेलत आहेत. दरम्यान वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली जेणेकरून अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत त्यांना पोहोचता येईल. याच दरम्यात त्यांनी अनाथ असलेल्या जवळ जवळ ४८ मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतल्या. त्यातील १२ मुलींना त्यांनी उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे रहाण्यास प्रोत्साहन दिले. अनेक महिलांचा आदर्श त्या बनल्या. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग येथे २०१७ ते २०२० या कालावधील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे न्यायाधीश जयदीप मोहिते  यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले हे करीत असताना अनेक योजना त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवून अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले.
याचवेळी पुढे कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागला आणि त्या वेळी त्या परिस्थितीत जिथे आपले लोकही साथ सोडीत होते तिथे जिविता पाटील यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. तर जवळ जवळ ५८ कुटुंबातील सर्व कोरोनाग्रस्त सदस्यांना दोनवेळच्या जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम त्यांनी केले हे करीत असताना जिथे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली होती तिथे जीविता पाटील यांच्यावर देखील मोठे संकट आले. घरातील धान्य संपले असताना या माऊलीने तशा परिस्थितीतही स्वतःचे सोन्याचे मौल्यवान दागिने गहाण ठेवून घरातील धान्य भरले व स्वतः जेवण बनवून ते गरजवंतांना पोहोचविण्याचे काम त्यांनी त्या परिस्थितीत केले. कोरोनामधून सावरल्यानंतर त्यांनी लोकांची गरज ओळखून आपली स्वतः ची तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन रजिस्टर केली. व त्याच्या माध्यमातून समाजात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली यादरम्यान अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले.
अनेक एकल, परितक्त्या महिलांना त्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा दिली. समाजातील एकट्या अपंग व्यक्तींना त्या दरमहा राशन देण्याचे कार्य करतात त्यांच्या या कार्यात अनेक दानशूर व्यक्तींनी देखील सहकार्य केले परंतु त्यांनी आजपर्यंत कधीही कोणाकडून पैशाच्या स्वरूपात मदत स्वीकारली नाही तर वस्तू रुपात मदत स्वीकारली आणि ती योग्य त्या गरजवंतांपर्यंत दात्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे पारदर्शक काम त्यांनी केले आहे. त्यांच्या याच कामाची दखल अनेक संस्था घेत असतात. समाजातील लोकांची विशेषतः महिलांची गरज ओळखून महिलांवर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या कायदेशीर सल्ल्याची गरज ओळखून त्यांनी स्वतः वकील होण्याचा निर्णय घेतला. ॲड.दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथे २०२१ मध्ये त्यांनी सीईटी देऊन प्रवेश मिळविला आणि ३ वर्षाच्या या शैक्षणिक वर्षात त्या प्रथम श्रेणीत वकिलीची परीक्षा पास झाल्या आणि अनेक महिलांच्या प्रेरणास्थान बनल्या. इथवरच न थांबता त्यांनी २०२४ या शैक्षणिक वर्षात LLM (Master of Law) या मास्टर डिग्री साठीची सीईटी देऊन त्यात चांगले गुण संपादन करीत बीसीटी कॉलेज ऑफ लॉ न्यू पनवेल येथे त्यांनी LLM साठी प्रवेश मिळविला.
सध्या वयाच्या ४४ व्या वर्षी त्या LLM च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. तसेच यानंतर ट्रान्सजेंडर या अतिसंवेदनशील विषयावर त्यांचा पी.एचडी. करण्याचा मानस आहे. आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासामध्ये साथ देणाऱ्या सर्वांचेच त्या आभार मानतात परंतु त्या काळात म्हणजेच २००४ साली पतीच्या निधनानंतर मनाचे खच्चीकरण करणाऱ्या समाजातील त्या लोकांचे आणि साथ सोडणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचेही त्या आवर्जून आभार मानतात. ॲड.जीविता पाटील या एकल महिला असून त्यांनी अनेक विद्यार्थींना मार्गदर्शन करून वाईट प्रवृत्तीपासून दूर केले आहे.
अनेक महिलांचे कौन्सलिंग करून त्यांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचविले आहेत. अनेक शैक्षणिक कार्यक्रमांत त्यांना चिफ गेस्ट म्हणून निमंत्रित केले जाते. व्याख्याता म्हणून बोलावले जाते तर अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्या काम पाहतात. साहित्यिक क्षेत्रात त्यांचे नाव आहे त्यांचे स्वलिखित ‘ भास आभास ‘ हे चारोळी संग्रह, ‘ काव्याकुंज ‘ तसेच ‘ काव्य प्रतिभा ‘ हे कविता संग्रह प्रकाशित झाले असून ‘ ती चे अस्तित्व ‘ हे कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक हितचिंतकांच्या आग्रहाखातर लवकरच आपल्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading