
सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
अलिबाग तालुक्यातील झिराड हद्दीतील मौजे झिराडपाडा येथे एका व्यक्तीने भाजी कापण्याच्या सुरीने डाव्या कुशीत मारून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोतदार बंगल्याजवळ बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी मोलमजुरी करणारे बलदेव परमेश्वर मलिक आणि आरोपी सदानंद गुमुस्ता मलिक हे दोघे झिराडपाडा येथील एका पत्र्याच्या खोलीत राहत होते. २४ सप्टेंबरच्या संध्याकाळी, बलदेव मलिकने आरोपीला जोरात बोलू नको, असे सांगितले असता, आरोपी संतापला आणि त्याने भाजी कापण्याच्या सुरीने बलदेवच्या डाव्या कुशीत वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत फिर्यादी याने बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा. ९ मी. च्या सुमारास मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीवर म.पो.हवा. ए. व्ही. करावडे यांनी गुन्हा रजि.९१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे १०९,(१), ३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपी याला गुरुवार दि.२६/सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोढडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास मांडवा सागरी पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या नेतृत्वाखाली पो.स.ई. सुमित खोत करत आहेत.