माथेरान (मुकुंद रांजणे) :
तीन ते चार पिढ्यांनी माथेरानमध्ये संघर्षमय जीवन जगत असताना निदान भावी पिढीच्या वाट्याला सुगीचे दिवस यायला हवेत यासाठी आता शेवटचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी एकमेव पर्याय उरलेला असल्याने येथील सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन गावाच्या व्यथा कथन केल्या आहेत.
माथेरान मधील सर्वपक्षीय मंडळींनी शुक्रवारी ( ४ ) रोजी पनवेल येथे जाऊन भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन माथेरान मधील स्थानिकांना त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना अभिप्रेत असणाऱ्या समस्यांचा संपूर्ण पाढाच वाचून दाखवला. जेणेकरून पर्यटन वाढीसाठी भाजप हाच एकमेव पक्ष काहीतरी करू शकतो ह्या आशेवर समस्त स्थानिक नागरिक दिसत आहेत. आजवर अनेकांनी इथल्या अल्प मतांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला आणि निवडून आल्यावर सर्वांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मतांच्या राजकारणापायी इकडे लक्ष दिले जात नाही हे अनेक वर्षांपासून घडत आले आहे.
ज्या ज्या वेळी इथे विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले गेले त्यावेळी होणाऱ्या विकास कामांना जबाबदार लोकप्रतिनिधीनी अप्रत्यक्षपणे विरोधाचीच भूमिका पार पाडली आहे. त्यामुळेच हे गाव आजही उपेक्षित दिसत आहे. याचा अनुभव माथेरान करांना आजही उघडया डोळ्यांनी पहावयास मिळत आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी केवळ गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
भाजप शिवाय माथेरानचा विकास अशक्य असल्याने आता पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आपल्या गावात विकासाची गंगा आली पाहिजे, सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात, सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायाची संधी निर्माण व्हावी, वाहतुकीची गहन समस्या दूर होऊन पर्यटनास चालना मिळाली पाहिजे,पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याशिवाय अन्य लोकांची या गावावर मक्तेदारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ती संपुष्टात येण्यासाठी पर्यायी मार्ग अर्थातच पनवेल धोदाणी मार्गे माथेरान फिनिक्युलर रेल्वे प्रकल्प असो किंवा कर्जत भिवपुरी मार्गे रोप वे प्रकल्प ही प्रस्तावित कामे भारतीय जनता पक्षाशिवाय अन्य कुणीही करूच शकत नाही याचा अंदाज माथेरान करांना आल्यामुळे येथील सर्वपक्षीय मंडळींनी थेट भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली असून काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले आहे. आमचे माथेरानवर विशेष प्रेम असून रायगड जिल्ह्यातील हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने येथील स्थानिकांच्या व्यथा आम्हाला ज्ञात आहेत. ई रिक्षा बाबतीत ज्या समस्या आहेत त्या सुध्दा मार्गी लावण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले.