श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार दि.७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर कोठुळे यांनी आरोग्यविषयक जनजागृती,आरोग्य तपासणी अशा विषयांवर मार्गदर्शन त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा आणि सुविधांबद्दलही उपस्थितांना माहिती दिली.
जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या फिरत्या कॅन्सर तपासणी व्हॅनच्या माध्यमातून दंत चिकित्सक डॉ.प्रद्युम्न ठोंबरे यांनी १०७ रुग्णांची तपासणी करुन संशयित मुखकर्क रुग्णांचं योग्य समुपदेशन केलं. स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्याने महिलांसाठी असणाऱ्या स्तनाच्या आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची तपासणी होऊ शकली नाही.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक,आरोग्य कर्मचारी आशा सेविका,अंगणवाडी सेविका यांचं सहकार्य लाभलं. यावेळी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर,आरोग्य सेवक संजय हासपाटील व कपिल वसावे,महाराष्ट्र जिवन्नोती अभियान ‘उमेद’ अंतर्गत महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा.आ.केंद्राचे आरोग्य सहाय्यक घनश्याम कोमटवार यांनी केलं.
ग्रामीण भागात कर्करोगाविषयी फारशी जागरूकता नसल्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती आणि मोफत प्राथमिक तपासणी सुरू केली आहे या सेवेचा नागरीकांनी लाभ घेऊन आपली तपासणी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.