बैलगाडा शर्यतीच्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण! २० दिवस उलटूनही आरोपींवर कारवाई नाही

बैलगाडा शर्यतीच्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण! २० दिवस उलटूनही आरोपींवर कारवाई नाही
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) :
बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या वादातून एका तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात एका तरुणाच्या हाताच्या बोटाचा लचका चावून तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतरही पोलिसांनी अद्याप कठोर कारवाई न केल्याने आजाद समाज पार्टी आणि बिरसा ब्रिगेडने प्रशासनाविरोधात आवाज उठवत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती खेळवल्या जात असतात. ५ मार्च रोजी संध्याकाळी माळवाडी येथे शर्यत संपल्यानंतर अजय सुरेश वाघमारे या तरुणाने आपल्या गावातील सागर जगन्नाथ कर्णुक यास “तुम्ही बैलगाडा शर्यत जिंकली का?” असा साधा प्रश्न विचारला. मात्र, यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळातच सागर कर्णुकने वाघमारे याला जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 
हा वाद वाढत जात असताना अजय वाघमारे याचे मित्र शंकर लक्ष्मण पवार आणि अजय नारायण पवार मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले. मात्र, त्याचवेळी सागर कर्णुक व त्याचे साथीदार कृष्णा मनोहर सोनावळे आणि संदेश राजेंद्र शेळके यांनी तिघांवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शंकर लक्ष्मण पवार यांच्या हाताचे बोट आरोपींपैकी एकाने तोंडाने चावून तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
२० दिवस उलटले, पण ठोस कारवाई नाही!
या घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्यात सागर कर्णुक आणि त्याचे साथीदार कृष्णा सोनावळे, संदेश शेळके यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे करत आहेत.
मात्र, घटनेला २० दिवस उलटूनही आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुमित साबळे आणि बिरसा ब्रिगेडचे रायगड जिल्हाध्यक्ष अनंता वाघमारे यांनी केला आहे.
पोलीस प्रशासनाला इशारा – तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन!
या प्रकरणातील आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आजाद समाज पार्टी आणि बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यांनी कर्जत पोलिसांना लेखी निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
या घटनेमुळे कर्जत तालुक्यात तणावाचे वातावरण असून, आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading