प्राथमिक शाळेला कुलूप प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

प्राथमिक शाळेला कुलूपप्रकरणीग्रामस्थ आक्रमक
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील देऊळकोंड येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आठवडाभरापेक्षा अधिककाळ बंद असून याबाबतीत ग्रामस्थांनी त्यांच्या संतप्त भावना केंद्रप्रमुख कुर्डूनकर यांच्या भेटीवेळी व्यक्त केल्या. याप्रकरणी शिक्षणविस्तार अधिकारी यांनी शिक्षकाच्या दांडीबद्दल केंद्रप्रमुखांनी अहवाल दिल्यास गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कारवाईची शिफारस करणार असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीस दिली. मात्र, यासंदर्भात गशिअ वसावे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस अधिकृत कारवाईची माहिती देण्याऐवजी मोबाईल रिसीव्ह करणे टाळल्याने याप्रकरणी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कानावर हात ठेवून दांडीबहाद्दर शिक्षकाची पाठराखण केली जाण्याची शक्यता वाढली आहे.
पोलादपूर तालुक्यात शिक्षण विभागाच्या आणि शिक्षक संघटनांच्या अनोख्या ऐक्यामुळे शिक्षकांच्या शिक्षणेतर कामांसाठीच्या दांडयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. 2-4 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर अर्धा पाऊण लाख रूपये पगार असलेल्या शिक्षकांकडून नोकरी करण्याबाबत अनुत्सुकता वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार पाहणारे सुभाष साळुंखे हे सध्या शिक्षणविस्तार अधिकारी पदावर कार्यरत आहेत तर श्री.वसावे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार आहे.
पोलादपूर नजिकच्या लोहारे देऊळकोंड येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक तुकाराम इंगवले हे एक आठवडयापेक्षा अधिक काळ शाळेकडे फिरकले नसल्याने दोन विद्यार्थी आडवाटेने लोहारे गावठाणातील प्राथमिक शाळेत जात आहेत. मात्र, याप्रकाराची माहिती नसलेले केंद्रप्रमुख कुर्डूनकर यांनी शनिवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर लोहारे देऊळकोंडच्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी शाळा बंद असल्याबाबत केंद्रप्रमुखांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. याप्रसंगी लोहारेचे माजी सरपंच प्रदीप सुर्वे यांनी शिक्षक तुकाराम इंगवले गेल्या आठ-दहा दिवसांपासून येत नसल्याचे सांगितले. यानंतर सुर्वे यांनी सदर प्रकाराची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीस देऊन केंद्रप्रमुख कुर्डूनकर यांच्यासोबत मोबाईलवरून संभाषण करून दिले असता इंगवले हे शिक्षक केंद्रांतर्गत क्रीडा व अन्य स्पर्धात्मक उपक्रमांवेळी देखील गैरहजर असल्याने ही बाब निदर्शनास आल्यामुळे व्हिजिट केल्याचे सांगितले. यावेळी केंद्रप्रमुख कुर्डूनकर यांनी शिक्षणविस्तार अधिकारी साळुंखे यांना याप्रकरणी अहवाल सादर करणार असल्याची माहितीही दिली.
याप्रकारासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने गटशिक्षणाधिकारी वसावे यांच्याकडे चौकशी करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ‘इफ यु थिंक यु आर बॅड, आय एम युवर डॅड’ अशी व्हाटसऍप स्टेटसवर प्रौढी मिरविणाऱ्यांनी मोबाईल कॉल स्विकारला नाही. यामुळे शिक्षणविस्तार अधिकारी सुभाष साळुंखे यांच्यासोबत संपर्क साधल्यावर त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस केंद्रप्रमुखांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी शिफारस करण्यात येईल, अशी माहिती दिली. एकूणच, शिक्षकाच्या दांडी मारण्याच्या या प्रकाराची वाच्यता आता मोठया प्रमाणात होत असताना प्रशासक असलेल्या पंचायत समितीचे अधिकारी संबंधित शिक्षकाविरूध्द कारवाई करतील अथवा सामंजस्य प्रस्थापित करतील, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading