नगरपंचायत पोलादपूरच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रसाद राजन इंगवले यांची बिनविरोध निवड जाहिर झाली. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर आणि महाड प्रांताधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे स्वागत केले. मात्र, नगराध्यक्षा सोनल गायकवाड यांचा राजिनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला असून नगराध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक लागणार असल्याने पोलादपूरकरांना आता कौन बनेगा नगराध्यक्ष? अशी उत्कंठा लागली आहे.
नगरपंचायत पोलादपूरच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रसाद इंगवले यांनी त्यांच्या मातोश्री संगिता इंगवले यांना निवडून आणले होते आणि दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वत: विजयी होऊन प्रभागातील वर्चस्व कायम ठेवले आहे. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्ण आणि नातेवाईकांना जेवणाचा डबा देण्याचे समाजकार्य स्वत:च्या आर्थिक कुवतीप्रमाणे सुरू ठेवणाऱ्या प्रसाद इंगवले यांनी खाटीक समाजासारख्या अल्पसंख्य समाजाचे असूनही बहुजन समाजाचे मतदार आकर्षित केले आहेत.
आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेण्याच्या प्रसाद इंगवले यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीचे सर्व समाजातून स्वागत होत आहे. प्रसाद इंगवले यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीनंतर सत्ताधारी नगरसेविका, स्विकृत नगरसेवक सुरेश पवार, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृउबा समिती संचालक लक्ष्मण मोरे, नितीन भोसले, भाजपा नगरसेविका अंकिता निकम जांभळेकर, सचिन मेहता यांनी उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले यांचा सपत्नीक सत्कार केला.
दरम्यान, पोलादपूर नगराध्यक्षा सोनल गायकवाड यांच्या नगराध्यक्षपदाचा राजिनामा घेण्यात आला आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राजिनामा मंजूर केल्यानंतर या रिक्त पदासाठी निवडणूक जाहिर होणार असून यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आणल्यानंतर दोन शिवसेनांमधील संघर्ष तीव्र होण्याच्या दृष्टीने कोणी उबाठा सेनेला साथ देईल अथवा उबाठा सेनेचे आणखी कोणी शिवसेनेच्या गळाला लागेल, याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.
याच दरम्यान, नगरपंचायत पोलादपूरच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर काँग्रेसचे नागेश पवार शिवसेनेमध्ये गेल्यामुळे स्विकृत नगरसेवक लक्ष्मण पां.जगताप यांचे पद पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत समाजपातळीवर कायम ठेवण्यात आले होते. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर काँग्रेसपक्षाच्या विरोधी गटाचे स्विकृत नगरसेवक संतोष चव्हाण यांच्या जागी उबाठा सेनेने शिवराज पार्टे यांना संधी दिली.
मात्र, आता उबाठा सेनेचे नगरसेवक सत्तेसोबत गेल्याने विरोधी गटाची सदस्यसंख्या घटल्याने स्विकृत नगरसेवकाचे पद समाजपातळीवर कायम ठेवण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी आक्षेप घेणार आहेत अथवा कसे, हे समजून येत नाही. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांचे गुणोत्तर पाहता विरोधकांचे स्विकृत नगरसेवक पद सत्ताधारी पक्षाकडे जाण्याची चिन्हे दिसून येत असल्याने विरोधी गटाचीही मान्यता धोक्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.