प्रतापगड येथे मंत्रयुद्ध अभ्यास शिबिर यशस्वी

Pratap Gad
पोलादपूर (शैलेश पालकर) :
माजलेला एक अफजल मोठ्या हिकमतीने जावळीच्या खोऱ्यात आणवून समूळ संपवला म्हणजेच काय तो पराक्रम नसून शिवछत्रपतींच्या या अद्वितीय कल्पक पुरुषार्थापासून शिकवण घेवून आपल्या नित्य व्यवहारात येणाऱ्या लहान-मोठ्या प्रत्येक संकटाला बुद्धीकौशल्याने सामोरे जावून जीवन निष्कंटक करायला शिकण्यासाठी या जावळीच्या खोऱ्यात येवून श्रीप्रतापगडीचे मंत्रयुद्ध आत्मसात करण्याची गरज शिवचरित्राचे गाढे अभ्यासक डॉ. संदीप महिंद गुरुजी यांनी व्यक्त केली. गेल्या १२ वर्षांपासून प्रचलित असणाऱ्या दुर्गाभ्यास शिबिराच्या समारोप प्रसंगी शिवरायांनीच वसवलेल्या व घडविलेल्या शौर्यभूमी प्रतापगडाच्या भवानी मंडपात ते बोलत होते.
अफजलखान सुमारे बावीस हजाराचे अफाट लष्कर व प्रचंड साधनसामुग्री घेवून स्वराज्यावर चालून आला असता कोणत्याही सहकाऱ्याचे अवसान गळू न देता शिवाजी महाराजांनी कौशल्याने आपला प्रत्येक मावळा या संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध केला. सह्याद्रीच्या कुशीतील सामान्यातील सामान्य माणसांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न टिकविण्यासाठी असामान्य कार्य करुन पाशवी दहशतवाद संपविण्याचा आदर्श वस्तूपाठ आपल्यासमोर घालून दिल्याचे, त्यांनी ठणकावून सांगितले. जीवनात अनेकानेक संकटे येतात ती आपली परीक्षा पाहण्यासाठी नसून आपल्यातील पुरुषार्थाला केवळ जागविण्यासाठीच असतात, याची जाणीव हे प्रतापगडीचे मंत्रयुद्ध प्रत्येकात निर्माण करत असते. शिवाजी महाराजांचे देदीप्यमान चरित्र केवळ ऐकून, वाचून, पाहून काहीही होत नाही तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जिजाऊ विद्यापीठात त्याचा व्यावहारिक साक्षात्कार अनुभविण्याचा आग्रह त्यांनी याप्रसंगी सर्वांना धरला.
बेळगावसह महाराष्ट्राच्या ९ जिल्ह्यातून आलेल्या शेकडो मातृशक्ती व मुलांचा सहभाग असलेल्या या दुर्गाभ्यास शिबिराचा प्रारंभ सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शिवाजी द्वितीय उपाख्य शाहू महाराजांच्या संगम माहुलीच्या वाळवंटात उभारलेल्या समाधीच्या अभ्यास दर्शनाने झाला. नव्यानेच निश्चित झालेल्या राजमाता येसूबाई साहेबांच्या समाधीचा अभ्यास करुन पोवई नाक्यावरील युद्धसज्ज शिवतीर्थाचे दर्शन होताच हे पथक अदालत वाड्यात पोहोचले. तेथून परळीच्या केदारेश्वर मंदिराचा अभ्यास करुन समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सज्जनगडाला समजून घेवून धावडशीच्या राजगुरु ब्रह्मेन्द्रस्वामींच्या समाधीचे दर्शन घेवून शिबिरातील सहभागी पहिल्या मुक्कामासाठी वाईच्या कृष्णाबाई व महा गणपतीचे आशीर्वाद प्राप्त करुन द्रविड हायस्कूलमध्ये दाखल झाले. लंडनच्या संग्रहालयातून भारतात आणविलेली ऐतिहासिक वाघनखे अगदी जवळून पाहण्याचा योग या शिबिराच्या पहिल्याच दिवशी अगदी भाग्याने जुळून आला होता.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सुस्तावलेल्या अजगरासारख्या पसरलेल्या पसरणीच्या घाटातून प्रवास करुन सारे शिबिरार्थी तिर्थ क्षेत्र श्री क्षेत्र महाबळेश्वरला पोहोचले. देवाचा अभिषेक व काकड आरती झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी इ . सन १६६५ च्या सूर्यग्रहणास आपल्या मातोश्री व सोनोपंत डबीरांच्या करविलेल्या सुवर्णतुलेचे महत्त्व समजून घेवून सर्वांनी कृष्णाई व सप्तगंगा मंदिराचे विज्ञाननिष्ठ स्थापत्य अभ्यासले. कृष्णाई मंदिराच्या पाठमोरी पृष्ठभूमीवर उगविणाऱ्या सूर्य नारायणाचे दर्शन घेवून सारीच दुसऱ्या दिवशीच्या पायी वाटचालीसाठी सिद्ध झाले . माहुलीचा कृष्णा-वेण्णा संगम, वाईची कृष्णा नदी ते कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, भागिरथी, सरस्वती यांच्या उगमस्थानापर्यंतचा प्रवास असा एकाच दुर्गाभ्यास शिबिरात नदीचा संगम, पात्र ते उगम रचनेत अभ्यासता आला.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर गावकरी शिवभक्त नाना वाडेकर, प्रदीप कात्रट, प्रशांत कात्रट, गनेश धनावडे, गणेश शेडगे व सहकार्यांनी दिलेल्या पौष्टिक न्याहारीचा आस्वाद चाखून साऱ्या शिबिरार्थिंनी ऐतिहासिक मार्गाने शिवस्तुती करणारी गीते गात ऐतिहासिक मार्ग तुडवत मेटतळे गाठले. मेटतळे येथीलं भाऊ शिंगरे, पोलीस पाटील मंगेश शिंगरे, वामन शिंगरे, तुकाराम शिंगरे, वैभव शिंगरे  व महिला मंडळाने पाणी व्यवस्था, जागा, इत्यादीची सोय करून मोलाचे सहकार्य केले .
भोजन प्रसादानंतर ऐतिहासीक रडतोंडी घाट उतरुन सारे पथक घोगलवाडी मार्गे पारच्या इतिहासकालीन कोयना नदी पुलाजवळ पोहोचले. ऐतिहासिक घाटवाटेने आलेल्या शिणवट्याला कोयनेच्या थंडगार मधुर जलाने शांत करवून, आई रामवरदायिनीच्या आशीर्वादाने पुनित झालेल्या पार्वतीपुराचा निरोप घेवून शिवरायांच्या चाणाक्ष नजरेने हेरलेल्या भोरप्याच्या डोंगरावर उभारलेल्या प्रतापगडाचा अभ्यास करण्यासाठी सारेच शिवभक्त शिबिरार्थी पथक नवोत्साहित झाले.
‘ठकासी महाठक l धटासी धट l’ ही समर्थउक्ती शब्दशः व्यवहारात उतरविणाऱ्या छत्रपती शिवरायांनी पराकोटीच्या दूरदृष्टीने उभारलेल्या प्रतापगडाला अभ्यासताना प्रत्येकजण भारुन गेला होता. नेपाळच्या गंडकी पाषाणात घडविलेली तुळजाभवानी, मारुतीराय, विशाल केदारेश्वर, गडपाल वेताळेश्वर, बालेकिल्ल्याचे महाद्वार व केदार बुरुज, टकमक तटबंदी, रेडका बुरुज, चिलखती यशवंत बुरुज, सूर्य बुरुज, तलाव बुरुज, तट-बुरुजात लपलेल्या सात दिंडी वाटा, झुंजार माची असं सारं काही साकल्याने अनुभवताना मूळ पालखी मार्ग बंद करुन त्यावर अस्वच्छ पाणी सोडल्याचे निदर्शनास आल्याची खंत बोलून दाखविले.
एकंदर प्रतापगडीचे मंत्रयुद्ध हे मातृशक्ती केंद्रीत दुर्गाभ्यास शिबिर यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पांचाळ, अरुण (अप्पा ) शिंगरे, राजेंद्र धोत्रे, सचिन गुजर , आर्यन दवे, स्वप्नील दवे, वैभव शिंगरे यांनी  बैठका घेतल्यानंतर दोन टेहळण्या करुन मार्ग सुकर केला. स्थानिक व्यवस्थेत , विजय नायडू, दीपक बावळेकर, राजू पुजारी, राजाभाऊ गुजर , पत्रकार राजेश सोंडकर,आनंद उत्तेकर, आनंद पटवर्धन, दीपक प्रभावळकर, गणेशतात्या जगताप यांनी मोलाचा सहभाग घेवून शिबिर पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading