
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
शारदीय नवरात्रौत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणाऱ्या देवीभक्तांसाठी पोलादपूर नगरपंचायतचे नगरसेवक तथा सभापती प्रसाद इंगवले यांनी महाड एस.टी.आगाराकडे मागणी केल्यानुसार एस.टी.बसच्या विशेष फेऱ्या सुरू झाल्याची अधिकृत माहिती एस.टी. महामंडळाचे आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली.
गुरुवारी घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार म्हणजेच आज दि. 4 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या या महाड ते प्रतापगड एस.टी. बसच्या दररोज दोन फेरीचे दसऱ्यापर्यंतचे वेळापत्रक महाड एस.टी.आगाराकडून जाहिर करण्यात आले आहे.
यानुसार पहिली फेरी सकाळी महाडमधुन निघण्याची वेळ सकाळी 7.30 वाजता, पोलादपुर निघण्याची वेळ सकाळी 08.00 वाजता, प्रतापगडावरुन निघण्याची वेळ 11.30 वाजता, दुसरी फेरी महाडमधून निघण्याची वेळ दुपारी 2 वाजता, पोलादपुर निघण्याची वेळ दुपारी 02.30वाजता, प्रतापगड वरुन निघण्याची वेळ सायंकाळी 05.30 वाजता असे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे.
भाविकांनी याची नोंद घेऊन सुरक्षित प्रवासासाठी प्रतापगड दर्शन एस.टी.बससेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती प्रसाद इंगवले यांनी व्यक्त केले.