कर्जत- ग्रामीण (मोतीराम पादीर) :
नेरळ फणसवाडी येथील रहिवाशांना ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाणीपुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने, दिवसाला फक्त तीन-चार हांड्यांपुरतेच पाणी मिळत आहे. यामुळे महिलांमध्ये रोज किरकोळ वाद होत आहेत, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
या संदर्भात महिलांनी दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी नेरळ ग्रामपंचायतीकडे रीतसर तक्रारी अर्ज दाखल केला होता. मात्र, ग्रामपंचायतीकडून समाधानकारक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महिलांनी दि. ०७ जानेवारी २०२५ रोजी पुनः तक्रारी अर्ज दाखल केला असून, २५ जानेवारीपर्यंत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
तक्रारी अर्जात महिलांनी इशारा दिला आहे की, पाणीटंचाई आणि त्यातून उद्भवणारे वाद गंभीर स्वरूप घेत असतील, तर त्यास नेरळ ग्रामपंचायत जबाबदार असेल. तसेच, दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी रिकाम्या हांड्यांसह ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन निषेध करण्याचा इशारा दिला आहे. महिलांच्या या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.