पोलादपूर शहरासह तालुक्यात होळीचा प्रचंड उत्साह; गावोगावी वाहनांची दाटी अन् ‘देताय काय घरपट्टी?’

Holi Poladpur
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान आणि तालुक्यातील अनेक गावांच्या ग्रामदैवतांच्या देवस्थानांच्या शिमगोत्सवाला हजारो चाकरमान्यांची उपस्थिती लाभली आहे. शहरात वाहनांमुळे ट्रॅफिक जॅम झाल्यास चाकरमान्यांना वाहतुक उल्लंघनाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे तर गावात गेल्यानंतर ग्रामसेवकांकडून ‘देताय काय घरपट्टी?’ अशी मागणी होत आहे. मात्र, तरीही प्रचंड उत्साहात शिमगोत्सवाचा आनंद आबालवृध्द घेत असून रंगपंचमीपर्यंत या सोहळयाचे आयोजन होणार आहे. आठगांव भैरी कोंढवीतील देवस्थानाच्या पालखीचे क्षेत्र तालुक्यात सर्वात मोठे असून पालखी गावोगाव फिरविण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यामध्ये होळीच्या आधीच्या दिवसापासून म्हणजे शनिवारपासून चाकरमान्यांची लगबग सुरू झाली असून रविवारी रात्री होळी लागण्याआधी सर्वजण गावी दाखल झाले. रविवारी सकाळपासून चाकरमान्यांनी गावातील घराकडे जाण्यापूर्वी महाबळेश्वर रस्त्यावर खरेदी करण्यासाठी वाहने थांबविल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अनेकांना वाहने उभी केल्याबद्दल वाहतूक पोलीसाकडून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले तर काहींनी कारवाई टाळून स्वेच्छेने दंड देणे पत्करले. साधारणत: होम लागल्यानंतरची धुलीवंदन सोमवारी असले तरी धुळवडीसोबत साग्रसंगीत अपेयपान व अभक्षभक्षणाची तयारी जोरदार तयारी करण्यासाठी मंगळवार अथवा बुधवारचा दिवसही नक्की करण्यात येणार आहे. तोपर्यंत होळीची सुटी संपून महावितरणचे कर्मचारी ‘देताय काय लाईटबिल?’आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी ‘देताय काय घरपट्टी?’अशी विचारणा करण्यासाठी सज्ज होणार आहेत.
पोलादपूर तालुक्यात होलिकोत्सव काळातील सामाजिक उपक्रमांच्या आयोजनाचे प्रमाण वाढीस लागले असून क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा, सासनकाठी नाचविण्याच्या स्पर्धांचे आयोजनासह, पालखी नाचविणे, गोटे उचलणे, सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचविणे आदी प्रकारांना प्राधान्य दिले जात आहेत.
पोलादपूर पोलीस ठाण्याने बिटनिहाय पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केल्याने तालुक्यामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी काठी तुटल्याच्या किरकोळ वादांच्या प्रकरणांमध्ये पोलीसांनी मध्यस्थीची यशस्वी भुमिका घेतल्याने गुन्हे दाखल करण्याची परिस्थिती टळली आहे. शिमगोत्सवामध्ये राजकीय व्यक्तींना व्यासपिठावर निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या प्रकारांना आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याच्या आवाहनानंतर थांबविण्यात आले आहे. धार्मिक सोहळयांना तसेच क्रीडास्पर्धांना राजकारणामध्ये सक्रीय परंतू चिरकूट व्यक्तींच्या भेटी देण्याच्या घटना तुरळक असल्याचे दिसून आले आहे.
पोलादपूर शहरामध्ये शनिवारी चोरहळकुंड प्रकारात दुकानाबाहेरचे बल्ब चोरण्याचे प्रकार झाले असून दुकानाचे फलक चोरून दुसऱ्या दुकानावर लावण्याची अनिष्ट प्रथादेखील बंद झाली असल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. शहरात श्रीदेवी गंगामाता मंदिरासमोरील सावित्री नदीच्या घाटावर होळीची परंपरा नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडली तर ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये संपूर्ण पोलादपूरसह तालुक्याचे आराध्य दैवतांची काठी पालखी भैरवनाथनगर सहाणेवर आगमन होऊन होलिकोत्सवाने शिमगोत्सवाची सुरूवात झाली. रात्री हजारो पोलादपूर वासियांच्या उपस्थितीत होमकुंड पेटविण्यात येऊन नारळ अर्पण करून होलिकोत्सव साजरा झाला. पोलादपूर तालुक्यातील अनेक गांवांमध्ये होम पेटवून होलिकोत्सव साजरा झाला. पोलादपूर तालुक्यातील आठगांव भैरी कोंढवी गावातील शिमगोत्सव तालुक्यातील आठ गांवांमध्ये विस्तारलेला असल्याने सर्वात मोठी पालखीप्रदक्षिणा असलेला मानला जात आहे. साधारणपणे रंगपंचमीपर्यंत ठिकठिकाणच्या पालखी प्रदक्षिणा होणार असून यानिमित्ताने देवस्थानांचा वार्षिक खर्च चाकरमान्यांसह ग्रामस्थांच्या देणगीरूपाने भागविला जात असतो.
प्रत्येक भाविकांच्या मोबाईलच्या स्टेटसवर ‘आमच्या गावांशी हाय शिगमा’ व्हिडीओ क्लीपसह दिसून येत असून प्रत्येकाला आपल्या गावापर्यंत न पोहोचलेल्या ग्रामस्थ भाविकांना या व्हिडीओ स्टेटसद्वारे ग्रामदैवतांचे दर्शन व्हावे, या सदभावनाही दिसून येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading