तालुक्यातील युध्दकाळातील तसेच सेवाकाळातील तब्बल 17 शहिद जवानांच्या स्मृती चिरंतन करण्यासाठी पोलादपूर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शहिदस्तंभ उभारण्याची आवश्यकता आहे. याखेरिज, असंख्य जवान पहिल्या व दुसऱ्या महायुध्दावेळी पोलादपूर तालुक्यातून रवाना झाले असता त्यापैकी कोणीही परत आले नसल्याने या जवानांबाबत माहिती घेऊन या शहिद स्मृती स्तंभाची उभारणी होण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केली आहे.
15 वर्षांपूर्वी पोलादपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी रायगड जिल्ह्यातील एका पत्रकार संघटनेमार्फत मांडलेल्या ठरावाकडे त्या ग्रामसभेतील अन्य वादग्रस्त विषयामुळे दूर्लक्ष झाले. त्यानंतरच्या पोलादपूर पंचायत समितीच्या आमसभेमध्ये याबाबतचा ठराव मांडण्यात ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यश मिळविले.
दुसऱ्या महायुध्दातील पोलादपूर तालुक्यातील पहिले शहिद खडपी येथील सयाजी जाधव, कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ, पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील गणपत सालेकर, देवपूर येथील संदीप महाडीक, काटेतळीतील गणपत सकपाळ, पोलादपूरमधील राकेश सावंत अशा 14 शहिद जवानांचा उल्लेख विविध युध्दजन्य परिस्थितीत प्राणाची आहुती देऊन देशाच्या सीमावर्ती भागांचे रक्षण केल्याबद्दल भारतीय सेना दलाच्या विविध रेजिमेंटस् कडून केला गेला आहे. यामुळे पाच वर्षांपूर्वी पोलादपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये या सर्व शहिद जवानांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी शहिद स्मृती स्तंभ उभारण्याकामी ग्रामपंचायतीने जागेसाठी पाठपुरावा करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केली होती.
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे वझरवाडी कलमवाडी येथे पहिल्या महायुध्दासाठी तुर्भे खुर्द येथून रवाना झालेल्या 83 सैनिकांपैकी 7 जणांनी आपले बलिदान दिल्याचा उल्लेख स्पष्ट करणारा एक शहिद स्मृती स्तंभ आढळून आला आहे. यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दासोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये गेलेल्या सैनिकांच्या माहितीसह चार देशांतर्गत सैनिकी कारवायांमध्ये सहभागी झालेले सुभेदार बी.जी.मोरे तसेच भारत पाकिस्तान सीमेवर 2000 हून अधिक कबालींचा एकटयाने खात्मा करून असीम पराक्रमाचा परिचय करून देणारे महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांच्या पराक्रमाची माहिती आगामी पिढीसमोर आणण्यासाठी हा शहिद स्मृती स्तंभ उभारण्याची गरज आहे.
पोलादपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर लगतच्या सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील चोळई गावात पत्रकारांच्या संघटनेमध्ये नव्याने सामील झालेल्या पत्रकारांनी या नायक मराठा भवनासोबतच शहिद स्मृती स्तंभाची उभारणी करण्यात येण्यासाठी समाजाकडे मागणी केली. त्यामुळे त्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार व तत्कालीन खासदार अनंत गीते यांच्याहस्ते शहिद स्मृती स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पण नायक मराठा भवनासह शहिद स्तंभाचे काम रखडले. यानंतर हे प्रयत्न पुन्हा सुरू होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यामध्ये शहिद स्मृती स्तंभाची मागणी करताना कोतवाल रेववाडीतील दिलीप शिंदे, देवपूरचे संदीप महाडीक, गोळेगणीतील सुरज मोरे आदींचा सेवाकाळात मृत्यू झाल्याच्या घटनांचा आढावा घेत आतापर्यंत पोलादपूर तालुक्यातील 18 जवान सेवा काळात युध्दजन्य अथवा सेवा बजाविताना देशाच्या कामी आल्याची माहिती देऊन सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे शहिद स्मृती स्तंभाची मागणी लावून धरली.
पोलादपूर येथे पोलादपूर तालुका आजी माजी सैनिक सेवा कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून जेव्हा विश्रामगृहाची दुरूस्तीची मागणी करण्यात आली. तेव्हा नवीन सुसज्ज विश्रामगृह आणि पोलादपूर तालुक्यातील शहिद जवानांच्या स्मरणार्थ शहिदस्तंभ उभारण्याची पत्रकारांची अनेक वर्षांची मागणीदेखील आपण पूर्ण करणार असून पोलादपूर तालुक्याप्रमाणे माणगांव येथेही भरशहरामध्ये सैनिक कल्याणासाठी जमीन उपलब्ध असल्याने मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्या तसेच नगरविकास नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून तेथेही आजी-माजी सैनिकांचे विश्रामगृह उभारणार असल्याचा निर्धार स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
मात्र, अलिकडेच पोलादपूर तालुका आजी माजी सैनिक सेवा कल्याणकारी संस्थेच्या विश्रामगृहाच्या नियोजित इमारतीसाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याची चर्चा होऊन या कामाचे भूमिपुजन आचारसंहिता जारी होण्यापूर्वी करण्यात आले असता यावेळी शहिद स्मृती स्तंभाचे विस्मरण झाले. त्यामुळे तब्बल 18 शहिद जवान तसेच पहिल्या, दुसऱ्या महायुध्दातील शहिद व बेपत्ता सैनिकांचे एकत्रित स्मारक उभारण्यासह आझाद हिंद सेना तसेच ब्रिटीश बॉईज कंपनीचे जवान यांच्या स्मृती जपण्याचे काम करण्याची गरज या शहिद स्मृती स्तंभाच्या माध्यमातून आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी व्यक्त केले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.