
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये सध्या सुमारे 1000 हून अधिक माकडांचा सुळसुळाट असून भाद्रपद महिन्यात निर्बिजीकरण झालेल्या कुत्र्यांपासून नागरिकांची सुटका झाली असली तरी माकडांनी मात्र लोकसंख्यावाढीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शाळा व बाजारपेठेकडे जाणाऱ्या महिला व बालकांना या माकडांचे भाद्रपदातील कुत्र्यांप्रमाणे केले जाणारे चाळे पाहताना खजिल व्हावे लागत आहे. परिणामी, येत्या काळामध्ये माकडांची संख्या झपाटयाने वाढणार असून पोलादपूर शहरातील माकडांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पोलादपूर नगरपंचायत व वनविभागाने संयुक्त उपक्रम राबवून शहरातील नागरिकांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलादपूर तालुक्यात तब्बल 25 वर्षांपूर्वी पोलादपूरची ग्रुपग्रामपंचायत असताना गावडुक्करांनी हैदोस घातला होता. यानंतर पोलादपूर ग्रामपंचायत झाल्यानंतर या गावडुक्करांना पकडून पोलादपूरपासून दूर नेऊन सोडण्याची मोहिम राबविण्यात आली. पोलादपूर ग्रामपंचायत आल्यानंतर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आणि माकडांच्या कळपांचे आगमन 2003-2004 दरम्यान पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या गहू तांदूळ घोटाळयावेळी रेशनधान्यासह टेम्पो पकडण्यात आल्यानंतर सडलेल्या गहू तांदळावर ताव मारण्यासाठी झाले. 2018 मध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलादपूर शहरामध्ये अनेकांना चावे घेतल्यानंतर कुत्रे घातक वाटू लागले तर माकडही पिसाळून एका महिलेला चावा घेऊन सिध्देश्वर आळी परिसरात दहशत माजवू लागले होते. त्यामुळे प्राधान्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढून श्वानदंशाच्या घटना वाढू नयेत यासाठी पोलादपूर नगरपंचायतीने कुत्र्यांची धरपकड सोसायटी ऑफ ऍनिमल प्रोटेक्शन या कोल्हापूर येथील संस्थेच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात निर्बिजीकरणाची मोहिम राबवित नागरिकांना श्वानदंशापासून दिलासा दिला. यामुळे पोलादपूर शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येऊन कुत्र्यांच्या आक्रमकतेलादेखील पायबंद बसून श्वानदंश टळले आहेत.
2021 यावर्षी माकडाच्या चाव्याने एक महिला जखमी होण्याच्या घटनेनंतर अद्याप पोलादपूर नगरपंचायतीने पोलादपूर तालुका वन विभागाकडे माकड पकडण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळयात अनेक मादी माकडे आपल्या छातीला कवटाळून पिल्लं घेऊन वावरताना दिसत असून पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी मादी माकडांकडून नागरिकांवरही मोठयाने आवाज काढून दहशत निर्माण केली जात असल्याचे दिसून आले आहे. या माकडांच्या कळपातील मोठी माकडे आणि त्यांचे वंशज मोठया प्रमाणात एकाच परिसरात वावरत असून या माकडांचे कळप श्रीकाळभैरवनाथ मंदिर परिसर, पोलादपूर तहसिल व नगरपंचायत कार्यालय, आनंदनगर, गाडीतळ, भैरवनाथनगर, सिध्देश्वरआळी, जुने पोलीस ठाणे तसेच महाबळेश्वर रोडवरील भाजी व फळांची दुकाने या परिसरांमध्ये वावरत असल्याने या भागांतील नागरिक खुपच त्रासलेले दिसून येत आहेत. या माकडांच्या उपद्रवाची दखल पोलादपूर नगरपंचायतीने आणि पोलादपूर वनविभागाने वेळीच न घेतल्यास भविष्यात सरावलेल्या माकडांच्या कळपांकडून पोलादपूरवासियांवर हल्लेही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलादपूर शहरानजिकच्या काटेतळी गावामध्ये एका माकडाने पाच-सहा जणांना कडकडून चावे घेतल्यानंतर मंगळवारी पोलादपूर शहरामध्ये या माकडाने प्रवेश करून बँक ऑफ इंडिया परिसरातील बाजारपेठेमध्ये व्यापारी, पादचारी आणि महिलांना त्रास देण्यास सुरूवात केली. यावेळी दुकानदार सचिन बुटाला आणि पेपरविक्रेते दिलीप साबळे यांना या माकडाने चावे घेतल्याने त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून रेबिजची इंजक्शन्स घेतली. मात्र, यादरम्यान माकडाला पकडण्यासाठी पोलादपूर येथील वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी आदिवासी बांधवांना माकडाने चांगलेच दमविले होते. मात्र, तेव्हा चावणारे माकड जेरबंद करण्यात यशस्वी झालेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलादपूर नगरपंचायतीला माकडांपासून पोलादपूरकरांची कायमस्वरूपी सुटका करण्याची इच्छा दिसत नसल्याने अद्याप अनेक घरांचे काँक्रीटचे पत्रे तसेच वायफाय केबल, केबल टिव्ही, महावितरणची विद्युतमीटरपर्यंत जाणारी सर्व्हिस केबल, खिडक्यांची तावदाने यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
पोलादपूर शहरात येणाऱ्या माकडांकडून वेगवेगळया लोकवस्त्यांमध्ये छप्परांवरून उडया घेणे, कपडे, धान्य, वाळत घालायचे पदार्थ तसेच पेरू, आंबे आणि अन्य फळांची नासधूस केली जात आहे. अनेकांच्या घरांमध्ये घुसून अन्नपदार्थ पळविण्याच्या घटनांमुळे गृहिणीही त्रस्त झाल्या आहेत. पोलादपूर शहरातील माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याऐवजी केवळ जळाऊ लाकूड आणि फर्निचरच्या लाकडावर लक्ष ठेऊन असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या तब्बल पंधरा-वीस वर्षांपासून माकडांच्या उच्छादाकडे दूर्लक्ष केले गेले. यामुळे माकडांची संख्या वाढून उन्हाळयाआधी दरवर्षी माकडांच्या आक्रमकवृत्तीला माणसांना सामोरे जावे लागत आहे. पोलादपूर नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांच्या संख्यावाढीचा बंदोबस्त केला त्याप्रमाणेच माकडांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभाग आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने युध्दपातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे.