पोलादपूर येथे श्रीकाळभैरवनाथांच्या जत्रोत्सवाला तुफान गर्दी

पोलादपूर येथे श्रीकाळभैरवनाथांच्या जत्रोत्सवाला तुफान गर्दी
पोलादपूर (शैलेश पालकर) :
तालुक्याचे आराध्यदैवत व पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी व रवळनाथांची पालखी होलिकोत्सवानंतर जत्रोत्सवासाठी पोलादपूरच्या भैरवनाथनगर सहाणेवर आल्यानंतर रात्री उत्तरोत्तर या जत्रौत्सवाला प्रचंड संख्येने जनसमुदायाची उपस्थिती लाभली. या जत्रौत्सवामध्ये काटेतळी गावाच्या श्रीरामवरदायिनी अघोरी पथकाचे भव्यदिव्य सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.
पोलादपूर ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या जत्रोत्सवावेळी काटेतळी, सडवली, चांभारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई, वाकण, मोरगिरी गावठाण येथील सासणकाठया आणि देवांच्या पालख्यांचे आगमन दरवर्षीप्रमाणे झाले. मात्र, यावर्षी काटेतळी गावाच्या श्रीरामवरदायिनी अघोरी पथकाने पेहेराव, वेशभूषा आणि फटाक्यांची आतषबाजी, तांडवनृत्य, आगीचे फुत्कार तसेच उंच सासणकाठी नाचविणाऱ्या शेकडो तरूण तरूणींच्या डिजेच्या जोरदार ठेक्यांवरील नृत्यासह आकाशात रंगीबेरंगी फटाके सोडून केलेल्या सादरीकरणामुळे जत्रोत्सवातील भाविकांच्या मनाचा ठाव घेतला.
शेकडो दुकाने, आकाश पाळणे, एलसीडी स्क्रीनवर प्रक्षेपण, खेळणी, मनोरंजन, खाद्यपदार्थ व मिठाईची दुकाने तसेच मोफत पाणपोईची व्यवस्था असलेल्या या पोलादपूरच्या जत्रोत्सवाने प्रत्येक सासणकाठी व पालखीच्या आगमनासोबत गावोगावच्या महिला व पुरूष आबालवृध्दांची गर्दी अनुभवत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काठया व पालख्यांचे मानधन व सन्मान ग्रामस्थांना देवस्थानतर्फे प्रदान केला. यावेळी देवस्थानच्या विश्वस्तांच्याहस्ते मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, बडोदा, रत्नागिरी, सातारा तसेच मूळ पोलादपूरकर असलेल्या अनेक भाविकांना श्रीफळ भेटविण्यात आले.
पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांच्यासह सर्व विश्वस्त मानकरी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने जत्रोत्सवाचे नियोजन केले. पहाटे काठया पालख्या श्रीकाळभैरवनाथ देवस्थान परिसरात जमा होऊन मोडजत्रेला सुरूवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading