पोलादपूर मच्छीमार्केची दयनीय अवस्था; मटन मार्केट झाले पार्किंग झोन

Poladpur Mutan Market
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
पोलादपूर ग्रामपंचायतीच्या काही इमारती नगरपंचायत झाल्यावर नगरपंचायतीकडे वर्ग झाल्यानंतर त्यांची व्यवस्थित देखभालदुरूस्ती करण्यात न आल्याने मोडतोड होऊन नगरपंचायतीचा महसूल घटू लागला आहे तर पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर मटन, चिकन, मच्छी विक्रेते यांची दुकाने सुरू झाल्याने वाहतुकीची कोंडी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर शिवाजीनगर भागातील पूर्वकडील गावठाणामध्ये एका इमारतीच्या बांधकामासाठी बांधकामाची सामुग्री पोहोचविणाऱ्या एका डम्परवरील ताबा सुटल्याने डम्पर मागील बाजूने वेगाने या मटन मार्केटच्या इमारतीला धडकल्यामुळे इमारतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या या घटनेबाबत या मटनमार्केटमधील मटनविक्रेत्यांनी पोलादपूर नगरपंचायतीला माहिती दिली असून याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी विराज लबडे यांनी संबंधित डम्पर मालकासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही डम्परमालकाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, या इमारतीचे नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या डम्परचालक मालकाच्या असहकारामुळे आजतागायत मटनमार्केटच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली नाही. आता पोलादपूर नगरपंचायतीचे श्रीवर्धनचे मुख्याधिकारी असलेल्या विराज लबडे यांना प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पुन्हा कार्यभार प्राप्त झाला असून त्यांनी अजूनही या प्रश्नी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलादपूर ग्रामपंचायतीच्या काळात एसटी स्थानकासमोर मच्छीविक्रेते बसत असताना त्याला अटकाव करण्यात आला. यानंतर पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर मच्छीविक्रेते आणि चिकन विक्रेते यांची दुकाने सुरू झाली. पोलादपूरच्या जुन्या महाबळेश्वर तसेच तलाठी सजेलगतच्या बाजारपेठेमध्येदेखील राहत्या घरासमोर चिकनविक्रीची दुकाने सुरू झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील व पूर्वेकडील सर्व्हिसरोड वर चिकनविक्रीची दुकाने सुरू झाली. यामुळे पोलादपूर शहरामध्ये जैवकचरा वाहून जाण्याची सुविधा नसतानाही मोठया प्रमाणात दुर्गंधी निर्माण करणारा जैव कचरा उचलण्याची सुविधा नगरपंचायतीच्या कचरा गाडीला करावी लागत आहे.
पोलादपूर नगरपंचायतीला मटनमार्केटची दुरवस्था झाल्यानंतर तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, त्यावेळी नगरपंचायतीने मटनमार्केटची दुरूस्ती करण्यासाठी तरतूद केली नसल्याने तसेच त्यानंतरच्या अनेक निधींच्या उपलब्धतेवेळी मटनमार्केट परिसराकडे दूर्लक्ष केल्यामुळे दिवसेंदिवस या मटनमार्केटमधील मटनविक्रेत्या दुकानदारांनी पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर दुकाने थाटून मटनविक्री सुरू करण्यास सुरूवात केली आहे.
सध्या मटनमार्केटमध्ये रामभाऊ प्रभाळे हे एकमेव मटनविक्रेते दुकान लावून असतात. पोलादपूर ग्रामपंचायतीने विविध कार्यकारी मच्छीमार सोसायटीकडे मच्छीविक्रीच्या शेडची जबाबदारी सोपविली असताना आता नगरपंचायत झाल्यापासून त्या मच्छिमार्केटमध्ये कोणीही मच्छीविक्रेता बसत नाही. परिणामी, परिसरातील एका कारमालकाने या मच्छिविक्रीच्या शेडचा वापर त्याची कार पार्किंग करण्यासाठी सुरू केला आहे.
पोलादपूर नगरपंचायतीने तातडीने मच्छी आणि मटनमार्केटची इमारत पाडून त्याठिकाणी मांसाहारी लोकांसाठी संकुल उभारून एकाच परिसरामध्ये मटन मच्छी व गावठी तसेच ब्रॉयलर कोंबडयांचे मांस विक्री करणारी दुकान गाळयांची व्यवस्था सुरू करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading