पोलादपूर पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस स्टेशन चे आयएसओ ए प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. ठाणे मानांकन प्रमाणपत्र, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांच्याहस्ते दि. 19 एप्रिल 2025 रोजी प्रदान करण्यात आले आहे.
पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे यांनी हे प्रमाणपत्र अलिबाग येथे जाऊन स्विकारले. पोलादपूर पोलीस ठाण्याची नवीन इमारत महात्मा गांधी तंटामुक्त गांव योजनेच जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता प्रथम पुरस्कारप्राप्त झाल्याने 50 लाखांच्या अनुदानास पात्र ठरल्याने बांधण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दैनंदिन पेट्रोलिंग तसेच अतिसंवेदनशील काळात पोलादपूर पोलीसांनी वाढीव बंदोबस्त तसेच रस्त्यावरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी रूटमार्च काढून पोलीस सज्जतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा जनसंपर्क वाढून जनतेसोबत सलोखापूर्ण संबंध निर्माण झाला आहे. स्मार्ट पोलिसिंग, संवेदनशील, आधुनिक, सतर्क, जबाबदार, विश्वसनीय, सशक्त पोलीस फौज, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम अशा विविध निकषांवर आधारित हा पुरस्कार पोलादपूर पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे.
पोलादपूर पोलीस ठाण्यातील कार्यालयीन कामकाज संगणकीय तसेच लॅपटॉपद्वारे केले जात असून कामात तत्परता आणि अत्याधुनिकता निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना बसण्यासाठी आसन, सुसज्ज इमारत, पाणपोई सध्या अनेक सोयीसुविधा पोलादपूर पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पोलादपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त गांव योजनेचा 25 हजार रूपयांचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता प्रथम पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांना प्राप्त झाल्याने तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांनी संबंधित तालुक्याच्या पोलीस ठाण्यासाठी 50 लाखांची तरतूद जाहिर केल्यानुसार पोलादपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
पोलादपूर पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस स्टेशन चे आयएसओ ए प्लस प्रमाणपत्र पुरस्कार मिळाल्याने पोलीस सहायक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे व सहकारी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.