
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित विद्यामंदिर पोलादपूर अंतर्गत शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मिडीयमच्या शाळेचा दाखला देण्यासाठी नियमबाह्य शैक्षणिक शुल्क12 हजार रूपये रक्कमेची मागणी केली जात असल्याप्रकरणी पोलादपूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलादपूर पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर शैक्षणिक शुल्काविना शाळा सोडण्याचा दाखला द्यावा लागल्याची माहिती मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित विद्यामंदिर पोलादपूर अंतर्गत शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मिडीयमच्या शाळेकडून दाखला देत नसल्याने मुलीला शैक्षणिक वर्षात अद्याप प्रवेश मिळालेला नाही, अशी तक्रार घेऊन जाधव पतीपत्नी हे पालक पोलादपूर मनसे जनसंपर्क कार्यालयात आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकारी यांनी संबंधित शाळेत जाऊन शाळेला दाखला देण्याची विनंती केली.
मुलींसाठी मोफत शिक्षणाची चर्चा सुरू असताना संबधित शाळेने दाखला देण्यासाठी टाळाटाळ करताना नियमबाह्य शैक्षणिक शुल्क 12 हजार रूपये रक्कमेची मागणी केल्याने पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील संबधित अधिकाऱ्यांच्याकडे मनविसे पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष देऊन दाखला मिळवून देण्याची विनंती केली. यावर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीदेखील टाळाटाळ केल्याने सदर विद्यार्थिनीचे शैक्षणिक अर्धे वर्ष झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी दाखला आवश्यक असल्याने विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलादपूर पंचायत समिती कार्यालयातच ठिय्या देण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थिनीचा दाखला मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतली.
रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित विद्यामंदिर पोलादपूर अंतर्गत शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मिडीयमच्या शाळेवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिकादेखील मनविसेकडून घेण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि नियमबाह्य शैक्षणिक शुल्क 12 हजार रुपयांसाठी अडवून ठेवलेला दाखला विद्यार्थिनीला कोणतीही रक्कम न भरता नि:शुल्क मिळाला.
यावेळी विद्यार्थिनीच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे व मनसे मनविसे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक यांचे आभार मानले. पोलादपूर मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, मनसे शहर उपाध्यक्ष प्रफुल पांडे, तुषार पवार, मनविसे तालुका सचिव ओंकार उतेकर, मनविसे शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, मनविसे शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड, अखिलेश शिंदे, विशाल पवार, आदित्य गायकवाड, निखिल उतेकर आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले.