पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील ग्रामीण व दूर्गम भागातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची नांवे डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याची मोहिम गेल्या आठवडाभरात तालुक्यात सर्वत्र गतिमानपणे सुरू झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांचे 27-092024चे तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालय संगायो शाखा यांच्याकडील दि.07-10-2024 रोजीच्या पत्रानुसार पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण व दूर्गम भागातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची नांवे डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याची मोहिम गतिमान करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या संजय गांधी निराधार योजना अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांच्या ग्रामीण व दूर्गम भागातील लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या पत्रांद्वारे डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्याचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर योजनेतील लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्याचे निर्देश प्राप्त झाले असल्याने पोलादपूर तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील वाकण तलाठी सजेच्या पाच वाडयांमध्ये तलाठी किरण जाधव यांनी डीबीटी ऑपरेटरच्या मदतीने ग्रामीण व दूर्गम भागातील लाभार्थ्यांची माहिती अपलोड केली असून पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वत्र ही मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दिली.