पोलादपूर तालुक्यात वणव्यांचं प्रमाण वाढलं; वाकण येथे गायी -वासरांसह गोठा भस्मसात, वन्यजीव देखील होरपळतात

Poladpur Onava Fire Kapade
पोलादपूर (शैलेश पालकर) :
तालुक्यात यंदा तापमानवाढ होण्यास लवकरच सुरूवात झाली असून वणव्यांनादेखील डिसेंबर 2024 पासून सुरूवात झालेली दिसून येत आहे. यामुळे डोंगरमाथ्यावर आगीचे नक्षीकाम दिसून येत असून पहाटे 16 अंश सेल्सियस असणारे तापमान दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल 43 अंश सेल्सियसवर जात आहे. वाकण येथे बुधवारी दुपारी गुरांचा गोठा वणव्याने पसरलेल्या आगीमध्ये भस्मसात होऊन 2 लाख 18 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याखेरिज विविध ठिकाणी वणव्यांच्या घटनांमध्ये मोर-लांडोर तसेच अन्य पक्षी तसेच असंख्य वन्यजीव होळपळून जीवंत जाळले जात असल्याने वणवाविरोधी मोहिमेच्या निष्क्रियता दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील कापडे पेट्रोलपंपाजवळील डोंगरउतारावर लागलेल्या वणव्यात मोर लांडोर असे वन्यपक्षी जळून खाक झाल्याचे फोटो गेल्या महिन्यात सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटीमध्ये कोणत्याही प्रकारचे वन्यपक्ष्यांचे अवशेष घटनास्थळी दिसून आले नसल्याने याविषयी कोणतीही नोंद करण्यात आली नाही. मात्र, बुधवारी वाकण येथे महामून इब्राहिम जोगीलकर यांच्या दोन जर्सी गायी आणि दोन वासरे यांच्यासह पेंढा, वासे, मेढे, लगे, नांगर, इतर वस्तू व जोखड असा एकूण 2 लाख 18 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल गोठयासह खाक झाल्याचा पंचनामा प्रभारी ग्राममहसूल अधिकारी आर.बी.पवार यांच्यामार्फत पोलादपूर तहसिल कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. वाकण येथे जळालेला गोठा हा जोगीलकर यांच्या घरापासून 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असून जोगीलकर यांच्या उदरनिर्वाहाचे साधन दुग्धव्यवसाय असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मदतीसाठी दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले आहे.
वणवा कसा लागतो?
कोळसा मिळविण्यासाठी वणवा लावण्याचा प्रकार काही माफियांकडून केला जातो तसेच उन्हं तापली असताना गवतावर गवत घासून नैसर्गिकरित्या वणवा लागत असल्याचे अनेक गुराख्यांच्या तसेच ग्रामीण भागातील पादचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. पुर्वी गुरांची संख्या अधिक असल्याने पावसाळयानंतर हिरवे गवत चारण्यासाठी गुरांना सोडल्यानंतर पुष्कळसे गवत गुरांनी फस्त केल्याने वणव्याची शक्यता कमी होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये गुरे आणि गुराखी यांची संख्या कमी झाल्याने डोंगर-रानातील गवताचे प्रमाण अधिक असल्याने नैसर्गिकरित्या टळटळीत उन्हांत गवतावर गवत घासले जाऊन वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
वणवाविरोधी मोहिमेची निष्क्रियता
भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 नुसार 5 हजार रूपये दंडात्मक कारवाई व 2 वर्षे कारावासाची  शिक्षा देखील होऊ शकते. मात्र, वनविभागाच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तालुक्यात वणवाविरोधी पथकांची रचना करण्यात आली नसून गेल्या काही वर्षांमध्ये 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वणवा विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यासंदर्भात कमालीचे दूर्लक्ष केले जात आहेत. वनविभागाकडून शहरी व शालेय पातळीवर वणवाविरोधी मोहिमेच्या जनजागृतीचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष वणवा प्रवण क्षेत्रामध्ये वनविभागामार्फत ग्रामस्थांचे कोणत्याही प्रकारचे प्रबोधन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading