पोलादपूर तालुक्यात वणव्यामुळे तापमानवाढीचा कहर; वणवा प्रतिबंधक उपायांचे मजूरीदर अत्यल्प

Poladpur Vanava
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील सह्याद्री रांगांतील वणव्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, परिणामी, दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत असून तापमानवाढीचा कहर झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत 23 अंश सेल्सियस तापमान असताना चार तासांनंतर 31 अंश आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 42 अंश सेल्सियस तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. वनविभागामार्फत वणवा प्रतिबंधक उपायांचे मजूरीदर अतिशय अत्यल्प असल्याने प्रतिबंधात्मक उपायांसाठी कोणीही पुढे सरसावत नसल्याने हे मजूरी दर वाढविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
कोकणात ऑक्टोबर हिटपासून डोंगरमाथा गरम होऊन वणवे लागण्यास सुरूवात होत असते. या वणव्यांचा सर्वात जास्त कालावधी मार्च ते मे दरम्यानच्या आर्द्रता कमी होऊन उष्णता वाढीमध्ये दिसून येत असून वणवा टाळण्यासाठी अथवा थांबविण्यासाठी चार ते सहा फूट रूंदीचे लांबपर्यंत चर खणून चरातील गवत काढून वणव्यांना थोपविण्याचा उपाय केला जातो.
मात्र, वनविभागाकडून या चरासाठी अतिशय अत्यल्प मजूरीदर दिला जात असल्याने स्थानिक वनमजूरांना हा मजूरीचा दर परवडत नसल्याने ही कामे करण्यासाठी कोणीही धजावत नाही. यामुळे कामाविनाच बिले काढून काम झाले मात्र, वणवाच मोठा असल्याने चर खणूनही वणवा पसरल्याचे कारण पुढे करून वणव्यांच्या उपायांच्या अत्यल्पदराच्या निरूपयोगीतेचा गैरफायदा घेतला जात आहे.
गेल्या आठवडयामध्ये पोलादपूर तालुक्यातील वाकण गोपाळवाडी ते पितळवाडीच्या नदीपात्रापासून रस्त्यापर्यंतच्या भागामध्ये साधारणपणे 3 कि.मी. रस्त्याच्या एकाबाजूला लागलेल्या वणव्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होऊन अनेक झाडांना जिवंत अग्निप्रवेश मिळाल्याने झाडांच्या फांद्या आणि बुंधे करपून झाडे निष्पर्ण झाल्याचे पाहायला मिळाले. काही झाडे बुंध्यात पेटून रस्त्यावर कोसळल्याचेही दिसून आले. या वणव्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील पक्षी व वनसंपदा असलेला पुष्कळसा परिसर या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जैवविविधतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, हा वणवा पसरत असताना कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रयोग वनविभागाकडून करण्यातआला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading