तालुक्यात देवदिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी मार्गशिर्ष प्रतिपदेपासून बैलदिवाळी साजरी करण्याची परंपरा असून गावोगांवी चाकरमानी आणि स्थानिक शेतकऱ्यांचा उत्साह यानिमित्त दिसून येत आहे.
पावसाळयानंतर अंगमेहनतीची कामे न केल्याने अखडलेल्या बैलाला कापणी मळणी आणि गवताचे भारे तसेच भात घराकडे आणण्यासाठी पुन्हा सज्ज करण्यासाठी पोलादपूरच्या ग्रामीण भागामध्ये देवदिवाळीनंतर बैलदिवाळीचे आयोजन गावोगावी केले जात असते. तर काही गावांमध्ये शेतकरीराजा आणि त्याची सर्जा-राजाची बैलजोडी शेतीच्या कामातून मोकळी झाली असते म्हणूनही बैलदिवाळी साजरी केली जात असते. देवदिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी मार्गशिर्ष प्रतिपदेपासून बैलदिवाळी साजरी करण्याची परंपरा असल्याने पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात यादिवशी बैलांना सजवून शेताच्या खाचरांमधून सजवून नाचविले जाते. बैलांच्या शिंगांना झुपकेदार रंगीबेरंगी तुरे लावून त्याची वेसण मालकांच्या हाती दिली जाते.
अनेकदा शेतकरी असूनही शेतीकामापासून दूर झालेल्या चाकरमान्यांनाही या बैलदिवाळीचे आकर्षण असल्याने अन्य गावांतून ट्रक, टेम्पो तसेच अन्य वाहनांमधून बैल आणला जातो. इतर गावांतील शेतकरी यासाठी बैलाचे भाडे घेत नसले तरी चाकरमानी हौसेने काही रक्कम त्यांच्या खिशात कोंबतात. बैलांना नाचवायचे म्हणजे जिगर पाहिजे, अशी भावना असल्याने ही जिगर निर्माण होण्यासाठी काहीसे मद्यपानही केले जाते. बैल नाचवायचा पहिला मान गावच्या फौजदाराचा म्हणजेच पोलीस पाटलाचा असतो. शेतकरीराजा मात्र, यादिवशी बैलाला स्वच्छ धुवून त्याच्यावर गुलाल उधळून सजवितो. यावेळी कापणी-मळणी झालेल्या शेताच्या बांधावरून खाचरामध्ये बैल उतरविताना स्वत: शेतकरी असेल तर तो स्वत:कडे बैलाची वेसण धरतो आणि चाकरमानी असेल तर दोन वेसणी लावून एक चाकरमान्याच्या तर दुसरी वेसण स्वत:कडे ठेवतो. बैलाची वेसण ओढली की तो पुढच्या पायावर झुकून उडी मारतो. असे अनेकदा केले की बैल नाचतोय असे वाटू लागते.
या नाचणाऱ्या बैलाचे उधळणे झाले की, ग्रामस्थ त्याच्याभोवती काठया घेऊन फिरतात; या काठयांच्या टोकाला बकरीच्या अंगावरील केसांच्या झुपक्यांसह चामडे असते. यामुळे या बैलाला शिंकेची भावना होऊन तो मान जोरात खाली वर करतो आणि काठी समोर आणणाऱ्यावर शिंग रोखून धरतो. बैलांचा हा प्रतिसाद त्यांची मरगळ अकड निघण्याचे लक्षण मानले जाते. यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या मर्दूमकीला साजेसाच असतो. असे बैल नाचविण्यासाठी अनेक जण गावाकडे आलेले असतात तर काही गावातलेच असतात. दुपारचे टळटळीत उन्हं लागण्यापूर्वी हा सण जोर धरतो आणि त्यानंतर मांसाहारी लोक येथेच्छ मांसाहारासोबत ‘पीनेका बहाना चाहिये…’ म्हणणारे या निमित्ताने मद्यपानही करतात. इतर शेतकरी गोडधोड करून सण साजरा करतात.
पोलादपूर तालुक्यातील दूर्गम भागात बैलदिवाळीचा आनंद सर्वत्र उत्साहाने घेतला जातो. पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागाने जपलेली ही बैलदिवाळीची परंपरा शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या मुक्या जनावरातील मरगळ म्हणजेच अकड दूर करण्याचा प्रयत्न असून चौखूर उधळणे, शिंगं रोखणे आणि वारा पिऊन बेभान होण्याचे पिसाटल्यागत वर्तन या बैलदिवाळीनंतर बैलांमध्ये शिल्लक राहात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.