पोलादपूर ( शैलेश पालकर ) गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोलादपूर तालुका अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली असून पोलादपूर तालुक्यातील कुंभळवणे येथील विठोबा अनाजी पार्टे यांची सोमवारी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या वाढदिवशी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र ज्येष्ठ नेत्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये प्रदान केले.
पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये वाय.सी.जाधव आणि सुहास मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, महाड विधानसभा मतदार संघातून सेक्युलर मतांना दिलासा देण्यासाठी नवीन तरीही अनुभवी व्यक्तीच्या हाती पक्षाच्या तालुका नेतृत्वाचे व्यक्तीमत्व असावे या हेतूने खासदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, माजी मंत्री व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार अदिती तटकरे आणि विधानपरिषदेवरील कोकण विभागीय स्थानिक स्वराज्यसंस्थेचे प्रतिनिधी आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या वाढदिवशी विठोबा अनाजी पार्टे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोलादपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली.
पोलादपूर येथे चंद्रकांतबुवा जाधव, सुभाषशेठ निकम, वाय.सी.जाधव, बाळा सकपाळ, कृष्णादादा करंजे, अजित खेडेकर, बारकू शिंदे, नरेश शेलार, अजय दळवी, बाळकृष्ण चव्हाण, अजय दळवी, रामचंद्र निकम, विष्णूबुवा जाधव, गोपाळ तळेकर, वामन जाधव, कृष्णाआप्पा तळेकर आणि महमद मुजावर आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोलादपूर तालुका अध्यक्षपदाची धुरा कुंभळवणे येथील विठोबा अनाजी पार्टे यांच्याहाती सोपविली.
पोलादपूर तालुक्यातील आगामी 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, पोलादपूर पंचायत समिती आणि दोन रायगड जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकांसोबतच होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पोलादपूर तालुक्यात प्रभाव सिध्द करताना खा. सुनील तटकरे, माजी मंत्री व आ.अदिती तटकरे आणि विधानपरिषदेवरील आ.अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सामोरा जाण्याची भुमिका नियुक्ती पत्र स्विकारताना नवनियुक्त अध्यक्ष विठोबा पार्टे यांनी व्यक्त केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.