पोलादपूरमध्ये भीषण अपघात : ऍक्टिव्हा स्कूटरला आयशर टेम्पोची धडक; एका तरुणाचा मृत्यू, मुलीची प्रकृती चिंताजनक

पोलादपूरमध्ये भीषण अपघात : ऍक्टिव्हा स्कूटरला आयशर टेम्पोची धडक; एका तरुणाचा मृत्यू, मुलीची प्रकृती चिंताजनक
पोलादपूर (शैलेश पालकर) :  

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील लोहारमाळ हद्दीत बुधवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. तांबडभुवन येथील सुनील सुरेश पवार (वय 41) हे आपल्या पत्नी, मुलगा आणि मुलीसह ऍक्टिव्हा स्कूटरवरून प्रवास करत असताना, पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने राँग साईडने ओव्हरटेक करत जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील पवार यांचा गंभीर जखमी अवस्थेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, पत्नी आणि मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघात घडला त्यावेळी आयशर टेम्पो (एमएच 07 एजे 2210) चालक अतुल अजित कालवणकर (वय 35, रा. मिठबाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) हा एपीएमसी मार्केटमध्ये नाकारलेले आंबे घेऊन परत जात होता. त्याने रस्त्याची अवस्था आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून अतिवेगात व चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना स्कूटरला डिझेल टँकजवळ धडक दिली. धडकेमुळे सुनील पवार यांचा तोल गेल्याने ते टेम्पोच्या मागील चाकाखाली गेले. त्यांच्या मुलीला गंभीर मार लागला तर पत्नी सुवर्णा आणि मुलगा श्लोक किरकोळ जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूरमधील जत्रोत्सवात सहभागी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस नाईक शिंदे, हवालदार सर्णेकर व स्वप्नील कदम यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. मुलीला पुढील उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात पाठवले असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी गणेश येरूणकर यांच्या फिर्यादीवरून आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काही वर्षांपूर्वी जत्रोत्सवाच्या काळात अशा अपघातांची मालिका पाहायला मिळत होती, जी अलीकडे थांबली होती. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा जुन्या दु:खद आठवणींना उजाळा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading