पोलादपूरप्रमाणे माणगांव येथेही उभारणार सैनिकांचे विश्रामगृह, आ.गोगावले यांनी शहिद जवानांच्या स्मरणार्थ शहिदस्तंभ उभारण्याची मागणी देखील केली मान्य

poladpur-sanman
पोलादपूर : पोलादपूर हा शूर जवानांचा तालुका आहे. तालुक्यातील आजी माजी सैनिकांची तसेच शहिद जवानांची संख्या लक्षणीय असून पोलादपूर तालुका आजी माजी सैनिक सेवा कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून जेव्हा विश्रामगृहाची दुरूस्तीची मागणी करण्यात आली. तेव्हा नवीन सुसज्ज विश्रामगृह आणि पोलादपूर तालुक्यातील शहिद जवानांच्या स्मरणार्थ शहिदस्तंभ उभारण्याची पत्रकारांची अनेक वर्षांची मागणीदेखील आपण पूर्ण करणार असून पोलादपूर तालुक्याप्रमाणे माणगांव येथेही भरशहरामध्ये सैनिक कल्याणासाठी जमीन उपलब्ध असल्याने मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्या तसेच नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून तेथेही आजी-माजी सैनिकांचे विश्रामगृह उभारणार असल्याचा निर्धार महाड पोलादपूर माणगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, लेफ्टनंट कर्नल राहुल माने, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार गोविंदराव साळुंखे, प्रभारी तहसिलदार समीर देसाई, पोलादपूर तालुका आजी माजी सैनिक सेवा कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष वाय.सी.जाधव, उपाध्यक्ष नामदेव उतेकर, सचिव परशुराम दरेकर, खजिनदार श्रीकांत पवार, सल्लागार श्रीपत जगदाळे व दत्ताराम मोरे  आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष वाय.सी.जाधव यांनी सैनिकांच्या विविध कामांसाठी आ.गोगावले यांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली तसेच पत्रकारांनीदेखील पाठपुरावा केला आहे, असे आवर्जून सांगितले.
आ.गोगावले यांनी पुढे, सैन्यदलात शौर्य गाजविण्यासह सेवा बजाविणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या विश्रामगृहाच्या जीर्ण अवस्थेमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यसरकारच्या माध्यमातून पोलादपूर येथील विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल सव्वा कोटींचा निधी उपलब्ध करीत असून अन्य काही मागण्यांसाठी आमचे पदाधिकारी सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली.
सत्काराला उत्तर देताना कर्नल किशोर मोरे यांनी, माजी सैनिकांच्या समस्या आणि अडचणींची माहिती देताना पोलादपूर येथे आजी-माजी सैनिकांसाठी उपयुक्त असे सुसज्ज कॅन्टीन सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी लेफ्टनंट कर्नल राहुल माने यांनी, राज्यासह देशातील विविध कंपन्या आणि उद्योगांचा सीएसआर फंड मोठया प्रमाणात असून त्यापैकी एक रूपयादेखील सैनिक कल्याणाकरीता खर्च होत नसल्याचा खेद व्यक्त करून पोलादपूरसारख्या रायगड जिल्ह्यातच नव्हे तर कोकणात सक्रीय असलेल्या कल्याणकारी संस्थेने विविध उद्योगांकडून या सीएसआर फंडाची मागणी आ.गोगावले यांच्यासारख्या जनतेशी नाळ जोडलेल्या नेत्याच्या माध्यमातून केल्यास सैनिकांना जनतेसाठीही विविध कल्याणकारी कामे राबविण्याची संधी मिळेल, इतका मोठा निधी उपलब्ध होईल, असे यावेळी मत मांडले.
याप्रसंगी कर्नल किशोर मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये कोंढवी फणसकोंड येथील अनाजी चव्हाण यांच्या वीरपत्नी, कोंढवीतील भरत मोरे यांच्या वीरपत्नी श्रीमती भाविका, कोंढवीतील लक्ष्मण निकम यांच्या वीरपत्नी संगिता निकम, चिखलीचे तानाजी बांदल यांच्या वीरपत्नी सुनीता बांदल, आडावळे येरंडवाडीतील गणपत सालेकर यांच्या विरपत्नी पोलादपूरमधील विरपिता राकेश सावंत यांचे वीरपिता तात्याबा सावंत तसेच सैन्यात नोकरी करणाऱ्यांच्या पत्नी, आई व वडील, माजी सैनिक यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
सन्मान सोहळयाचे सुत्रसंचालन परशुराम दरेकर यांनी केले.
रायगड जिल्हयाच्या शहिद परंपरेची सुरूवात पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील दुसऱ्या महायुध्दातील पहिले शहिद सयाजी जाधव यांच्यापासून झाली असून त्यानंतर कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ, पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील गणपत सालेकर, देवपूर येथील संदीप महाडीक, काटेतळीतील गणपत सकपाळ, पोलादपूरमधील राकेश सावंत अशी शहिदांची परंपरा कोतवाल रेववाडी येथील दिलीप नारायण शिंदे यांच्या बलिदानाने सुरू राहिली.
पहिल्या महायुध्दामध्ये पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील सुमारे 83 जणांनी बलिदान दिल्याचा एका स्तंभावर ब्रिटीशांनी कोरलेला मजकूर दिसून येत आहे. याखेरिज, तालुक्यातील असंख्य तरूणांना युध्दकाळात ब्रिटीशांनी सोबत नेल्यानंतर ते परत आले नसल्याचे तत्कालीन व समकालीनांनी वंशजांना सांगितल्याचा इतिहास कर्णोपकर्णी प्रचलित आहे. या शहिद जवानांच्या स्मृती प्रेरणादायी होण्यासाठी पोलादपूर तालुक्यात शहिद जवानांचे स्मारक स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी सातत्याने केली होती. या मागणीस आ.भरत गोगावले यांनी मान्यता दर्शवित नियोजित सैनिकी विश्रामगृहामध्ये शहिदस्तंभ उभारण्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading