केवळ विविध विकासकामांद्वारेच नव्हे तर वैयक्तिक लाभाच्या प्रकल्पांद्वारे रोजगार निर्मिती करून पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
पोलादपूर साखर येथील गोविंद चोरगे याच्या उद्योगासह पोलादपूर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी सिमेंट काँक्रीट रस्ता 4 कोटी 34 लक्ष, कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट काँक्रीट रस्ता 5 कोटी 62 लाख रुपये या मोठया कामांचा भूमिपूजन सोहळा रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले, विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत झाला तसेच यावेळी साखर येथे गोविंद चोरगे यांच्या सावित्री पॅकेज ऍंड ड्रिंकिंग वॉटर प्लांटचे उदघाटन आ. प्रवीण दरेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी झेडपी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, माजी तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे, तालुकाध्यक्ष तुकाराम केसरकर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, शिवसेना तालुकाध्यक्ष निलेश आहिरे, क्षत्रिय मराठा सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर यांच्यासह लक्ष्मण मोरे, उद्योजक गोविंद चोरगे, वैभव चांदे तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.प्रवीण दरेकर यांनी, माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण मानतो. दादा शिंदे यांच्या गावचा रस्ता झाला पाहिजे ही भावना व्यक्त झाल्यानंतर तो आपण मार्गी लावला. रस्त्याचा किंवा गावचा विकास करताना किती लोकं आहेत अशा प्रकारची डोकी न मोजता ज्या राजकारणात संवेदना लागतील त्या घेऊन काम करणारे आम्ही सारे कार्यकर्ते आहोत. म्हणून आज आपले हे स्वप्न पूर्ण होताना दिसतेय,असे सांगून ना.भरत गोगावले राज्याचे मंत्री आहेत. मीही भाजपाचा, विधिमंडळाचा नेता म्हणून काम करतोय. आम्ही महायुतीत आहोत. व्यापक असा विचार करून सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे.
माझा पोलादपूर तालुका सगळयात विकसित आहे त्या तालुक्याचे गाव आणि गाव रस्त्याने जोडले पाहिजे, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, चांगल्या शाळा, आरोग्य व्यवस्था पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात निश्चितच नियोजनबध्द काम होईल. आज सरकार आपले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे शब्द टाकला तर येणार याची मला खात्री आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी जे-जे काम लागेल ते आपण सरकारच्या माध्यमातून करून घेऊ, हा विश्वासही आ.दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ना.भरत गोगावले यांनी, शेतकरी वर्गाने पडीक जागेवर बांबूची लागवड करावी, आ.प्रवीण दरेकर यांच्या मुंबै बँकेचे आर्थिक सहकार्य घेऊन नवीन उद्योग हाती घ्यावेत. पोलादपूरमध्ये आ.प्रवीणभाऊंना लागेल ते सहकार्य मंत्रीमंडळाच्या माध्यमातून करू आणि तेदेखील जनतेसाठी मुंबई बँक आणि पक्षाच्या माध्यमातून सहकार्य करतील, असे सांगितले.
यावेळी ना.गोगावले यांनी, आजही आपल्या तालुक्यातील लोकं मुंबईला हॉटेल, रुग्णालयात, शिपायाची कामे करतात. हे चित्र बदलायला हवे. आपली मुलं एमपीएससी, यूपीएससी, उद्योगपती झाली पाहिजेत, हे स्वप्न बाळगायला हवे. येणाऱ्या काळात महायुती म्हणून या सर्व गोष्टींत लक्ष घालू. येथील राजकीय मंडळींनी राजकीय मतभेद न मांडता सर्वसामान्यांसाठी दिशादर्शक काम केले तर पोलादपूर तालुक्याचे चित्र बदलू शकतो, असे सांगितले.
पोलादपूर तालुक्यातील उद्योजक गोविंद चोरगे यांनी पाण्याचा नवीन प्लांट उभा केला आहे. त्याचा आदर्श तरुणांनी घेत लघुउद्योग उभारावे. त्याच्प्रमाणे शेतकरी वर्गाने पडीक जागेवर बांबूची लागवड करावी जेणे करून त्याचा आर्थिक स्तर उंचावत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले त्यासाठी लागणारे सहकार्य मंत्री म्हणून करणार असल्याची ग्वाही ना.भरत गोगावले यांनी दिली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.