
पेण :
पेण शहराकरिता नगरपरिषद पेण यांचे कडून भोगावती नदी पात्रा(पिंपळ डोह)तून पाणी उचलण्यात येत असून तेच पाणी पेणकरांना पिण्याकरिता पुरवण्यात येते. परंतु नदीपात्रातून पाणी उचलले जाते त्याचे दोनही बाजूस सुमारे 50 मीटर अंतरावर पेण शहरातून येणारे थेट गटाराचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करिता सोडले जात आहे त्यामुळे पेण शहरातील नागरिकांना थेट गटाराचे पाणी पिण्याकरता मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यात पेणचा जल शुद्धीकरण प्रकल्प हा योग्य मापदंडानुसार सुरू नसल्याची माहिती मिळत आहे.
सदर बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या व विशेष करून नवजात व लहान बालकांच्या जीवाशी खेळ करणारी आहे. तरी पेण शहराला थेट हेटवणे धरणाचे पाणी ज्यावर पेणकरांचा पहिला अधिकार असणे अपेक्षित आहे ते तात्काळ मिळावे. तसेच पेण शहराकरीता अद्ययावत जल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यास “माझं पेण” संघटने द्वारे तीव्र जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन पेण नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गणेश लक्ष्मण तांडेल सुनिल सत्वे दिलीप मुकुंद पाटील यांनी दिले आहे.