
ऋतिक आगावची शिक्षणात उंच भरारी आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी: प्रसाद भोईर
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
पेण तालुक्यातील दुर्गम निफाड आदिवासीवाडी येथील विद्यार्थी ऋतिक दामू आगाव याने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. ऋतिक याला एमबीबीएससाठी थेट सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याने तो तालुक्यातील आदिवासी समाजातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे तालुक्यात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे, तसेच विविध ठिकाणी सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे.
युवा नेते प्रसाद भोईर यांनी ऋतिक आगाव यांची भेट घेतली आणि त्याच्या या यशाचा सन्मान केला. त्यांनी ऋतिकला शुभेच्छा देताना असे प्रतिपादन केले की, “ऋतिकने केवळ एमबीबीएस शिक्षणावर थांबू नये, तर पुढे एमडी आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर बनून समाजात आदर्श ठरावा.” त्यांनी ऋतिकचे अभिनंदन करत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी ठरेल, असेही सांगितले.
ऋतिक आगाव हा निफाड आदिवासीवाडीमधील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे, कारण या दुर्गम भागात राहूनही त्याने कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एमबीबीएससाठी थेट सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, भविष्यात तो आपल्या समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.